कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकणार; काॅंग्रेसने ठेवले लक्ष्य; केंद्र सरकारवर आरोपही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:05 AM2023-11-05T06:05:12+5:302023-11-05T06:05:53+5:30
‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एक बैठक बोलावली होती.
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी मंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि २८ लोकसभा मतदारसंघांपैकी किमान २० ठिकाणी विजय मिळविण्याचे लक्ष्य निश्चित केले.
बैठकीत १९ मंत्री सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि त्यांवर मात करण्यासाठी केंद्राकडून कोणतीही मदत न मिळाल्याबद्दल चर्चा केली, असे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एक बैठक बोलावली होती. पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीबाबत चर्चा करणे हा बैठकीचा उद्देश होता. चर्चा पूर्ण झाली असून, २० जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे,’ असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी सार्वजनिक मंचावर संभाव्य बदलांची चर्चा केल्याने निर्माण झालेल्या गोंधळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत कोणताही संभ्रम नाही. विकासकामांशिवाय काहीही बोलण्याची गरज नसल्याचे पक्षश्रेष्ठांनी कळवलेले आहे.’
न बोलण्याच्या सूचना
ते म्हणाले, ‘सरचिटणीस रणदीपसिंग सूरजेवाला यांनी आम्हाला याबाबत न बोलण्याचे निर्देश दिले असल्याने जाहीर वक्तव्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तुम्हीही (माध्यमांनी) आम्हाला असे प्रश्न विचारू नयेत.