सील तुटलेली बाटली खरेदी करता का? कौमार्याबद्दल प्रोफेसरची वादग्रस्त पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 11:40 AM2019-01-15T11:40:53+5:302019-01-15T11:43:23+5:30
चौफेर टीकेनंतर प्राध्यापकांकडून फेसबुक पोस्ट डिलीट
कोलकाता: पश्चिम बंगालमधील प्रतिष्ठित जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापकाच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महिलांच्या कौमर्याविषयी प्राध्यापक कनक सरकार यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. तुम्ही सील तुटलेली बाटली खरेदी करता का?, असा प्रश्न सरकार यांनी कौमार्याबद्दल भाष्य करताना विचारला. यानंतर सरकार यांच्यावर टीकेची झोड उठली. यामुळे त्यांनी फेसबुक पोस्ट डिलीट केली.
लग्न न झालेली मुलगी तरुणांसाठी परीप्रमाणे असते, असं सरकार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. 'मुलगी जेव्हा जन्माला येते, तेव्हा ती सील पॅक्ड असते. कुमारवयीन मुलीचा संबंध संस्कृती, मूल्य आणि लैंगिक स्वच्छतेशी असतो. कुमारी मुलगी पत्नी म्हणून मिळाल्यास होणारे फायदे मुलांना माहीत नसतात. त्यामुळे अनेक मुलं मूर्ख बनतात,' असं सरकार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. 'कोल्ड्रिंकच्या बाटलीचं सील तुटलं असेल, तर तुम्ही ती खरेदी करता का?' असा प्रश्नही त्यांनी विचारला.
कनक सरकार यांच्या या पोस्टवर चौफेर टीका झाली. याबद्दल एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना, हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून मी काहीच चुकीचं बोललो नाही, अशी प्रतिक्रिया सरकार यांनी दिली. मात्र त्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट डिलीट केली आणि त्यांच्या पोस्टबद्दल स्पष्टीकरण दिलं. मी कायमच महिलांच्या अधिकारांचं समर्थन केलं आहे, असा दावा सरकार यांनी केला. यासाठी त्यांनी फेसबुकवरील जुन्या पोस्टचा संदर्भ दिला.