'INDIA आघाडीचे नेतृत्व करणार का?' श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा प्रश्न; ममता बॅनर्जी म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 03:05 PM2023-09-13T15:05:37+5:302023-09-13T15:06:07+5:30
ममता बॅनर्जींनी बुधवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली.
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 12 दिवसांच्या दुबई आणि स्पेन दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ममतांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली आणि त्यांना नोव्हेंबरमध्ये राज्यात होणाऱ्या व्यवसाय शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले. यावेळी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी ममतांना विचारले की, 'तुम्ही इंडिया आघाडीचे नेतृत्व करणार का?'
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या भेटीची माहिती दिली. ममता म्हणाल्या की, श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी मला दुबई विमानतळावर पाहिले आणि बोलण्यासाठी बोलावले. त्यांची भेट घेऊन मी भारावून गेले आणि त्यांना कोलकाता येथे होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिट 2023 मध्ये आमंत्रित केले.'
His Excellency The President of Sri Lanka Ranil Wickremesinghe saw me at the Dubai International Airport Lounge and called me to join for some discussion. I have been humbled by his greetings and invited him to the Bengal Global Business Summit 2023 in Kolkata. HE the President… pic.twitter.com/14OgsYjZgF
— Mamata Banerjee (@MamataOfficial) September 13, 2023
या संभाषणादरम्यान, श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी ममतांना विचारले की, तुम्ही इंडिया आघाडीचे नेतृत्व करणार का? यावर ममतांनी हसत उत्तर दिले. ममता म्हणाल्या, जनतेचा पाठिंबा मिळाला तर आम्ही नक्कीच सत्तेत येऊ. दरम्यान, ममता बॅनर्जी मंगळवारी दुबईला पोहोचल्या आणि बुधवारी दुबईहून स्पेनला जाणारे विमान पकडले. पश्चिम बंगालमध्ये यावर्षी 21-22 नोव्हेंबर रोजी बिझनेस समिट होणार आहे.
विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीचे नेृत्व कुणाकडे?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांनी मिळून 'इंडिया' आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीत काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव गट, आरजेडी, आप, जेडीयू, सीपीआय, सीपीएम, जेएमएमसह 28 पक्ष सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षांच्या या आघाडीत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत भाजपकडून सातत्याने इंडिया आघाडीवर निशाणा साधला जात आहे.