‘चंद्रयान-३’चे तंत्रज्ञान विकता का? अमेरिकेची विचारणा; इस्रो प्रमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 06:09 AM2023-10-16T06:09:33+5:302023-10-16T06:09:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रामेश्वरम : मोहीम यशस्वी होण्यापूर्वी ‘चंद्रयान-३’ अंतराळ यानाची प्रगती पाहिल्यानंतर अमेरिकेतील जटिल रॉकेट मोहिमेचा विकास करणारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रामेश्वरम : मोहीम यशस्वी होण्यापूर्वी ‘चंद्रयान-३’ अंतराळ यानाची प्रगती पाहिल्यानंतर अमेरिकेतील जटिल रॉकेट मोहिमेचा विकास करणारे तज्ज्ञ थक्क झाले होते. भारताने अंतराळ तंत्रज्ञान सामायिक करावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी रविवारी सांगितले.
काळ बदलला आहे, भारत सर्वोत्तम उपकरणे आणि रॉकेट तयार करण्यास सक्षम आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे, असे सोमनाथ यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सोमनाथ विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
काय म्हणाले सोमनाथ?
‘आपला देश खूप शक्तिशाली राष्ट्र आहे. आमचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता पातळी जगातील सर्वोत्तम आहे. ‘चंद्रयान-३’मध्ये जेव्हा आम्ही अंतराळ यानाची रचना आणि विकास केला, तेव्हा आम्ही ‘जेट प्रोपल्शन’ प्रयोगशाळेतील नासा- जेपीएलच्या तज्ज्ञांना आमंत्रित केले.
सुमारे ५-६ तज्ज्ञांनी इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली. आम्ही त्यांना चंद्रयान-३बद्दल माहिती दिली. त्याचे सॉफ्ट लँडिंग होण्यापूर्वी आम्ही केलेल्या तयारीबद्दल त्यांना सांगितले. त्यावेळी ते म्हणाले, ‘तुमची वैज्ञानिक उपकरणे खूप स्वस्त आहेत. तुम्ही वापरलेले तंत्रज्ञान उच्चपातळीचे आणि उत्तम दर्जाचे आहे. तुम्ही ते कसे तयार केले? तुम्ही हे अमेरिकेला का विकत नाही? असे त्यांनी आम्हाला विचारले होते.
‘गगनयान’ची शनिवारी चाचणी
मदुराई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण शनिवारी, २१ ऑक्टोबरला करणार आहे, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. या यानाची एकूण तीन चाचणी उड्डाणे करण्यात येणार आहेत. त्यातील हे पहिले चाचणी उड्डाण असेल. ते मदुराईत पत्रकारांशी बोलत होते.
या चाचणीत ‘क्रू मॉड्युल’ला बाह्य अवकाशात प्रक्षेपित करणे, ते पृथ्वीवर परत आणणे व बंगालच्या उपसागरात उतरल्यानंतर ते हस्तगत करणे, याचा समावेश आहे. क्रू मॉड्यूल गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाईल. पुढील वर्षी इस्रो मानवरहित आणि मानवयुक्त अंतराळ मोहीम राबविणार आहे.