भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 06:51 AM2023-01-08T06:51:45+5:302023-01-08T07:09:30+5:30
पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : भाजपमध्ये बदलाचे वारे वाहत असले तरी सर्वांच्या नजरा राजस्थान व मध्य प्रदेशकडे लागलेल्या आहेत. या राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजप कोणाच्या नेतृत्वात लढतो, याची उत्सुकता आहे. कर्नाटकात प्रचंड असंतोष असला तरी भाजपने नेतृत्व बदलास इन्कार केला. त्रिपुरामध्ये विप्लव देव यांच्या जागी माणिक साहा यांच्याकडे सूत्रे दिली. राज्यांत बदल गरजेचे असले तरी याची किंमत चुकवावी लागत आहे. मात्र पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे.
मध्य प्रदेश : चौहान यांना अभय
मध्य प्रदेशात बदल गरजेचा आहे, अशी स्थिती निर्माण झाल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांना बदलले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. तथापि, यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा झालेल्या असल्या तरी चौहान यांच्यावर काहीही
परिणाम झालेला नाही. प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौहान यांना वाचविले आहे.
त्रिपुरा : सूत्रे साहांकडे
२०२३ मध्ये सर्वप्रथम त्रिपुरात विधानसभा निवडणुका होतील. तेथे भाजपने काही दिवसांपूर्वीच विप्लव देव यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून माणिक साहा यांना मुख्यमंत्री केले. अनेक वर्षांपासून डाव्यांचा बालेकिल्ला असलेले हे राज्य भाजपला कोणत्याही स्थिती हातून जाऊ द्यायचे नाही, त्यामुळे त्रिपुरा भाजपसाठी महत्त्वाचे मानले जाते.
कर्नाटक : धुसफूस सुरूच
कर्नाटकमध्ये सत्ताविरोधी लाटेची शक्यता स्पष्ट दिसत असतानाही अखेरच्या वेळी भाजपने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कातील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढण्याचे निश्चित केले. बी. एस. येदीयुरप्पा यांना हटवून भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले होते. परंतु बोम्मई याच्याबाबतचा असंतोष दाबण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वापरण्यात येईल व लिंगायत समुदायाचे ज्येष्ठ भाजप नेते येदीयुरप्पा यांना खुश ठेवण्यासाठी त्यांचे पुत्र विजयेंद्र यांना पक्षात चांगले स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. नलीनकुमार कातील यांच्या आरोग्याचे कारण असले तरी ऐनवेळी भाजप ना मुख्यमंत्री बदलणार आहे, ना प्रदेशाध्यक्ष बदलेल.
राजस्थान : एकजूट नाही
राजस्थानमध्ये भाजप अनेक गटांत विभागलेला दिसत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सतीश पुनिया, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे वेगवेगळ्या गटांचे नेते आहेत. येथे कोणत्याही एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजप एकजूट होत नाही. त्यामुळे राजस्थानमध्ये भाजप विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच लढेल, असे म्हटले जात आहे.
छत्तीसगड : माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याशिवाय दुसरा मोठा नेता नाही. नेतृत्वात बदल करूनही भाजप पूर्वी जेथे होता तेथेच आहे.
तेलंगणा : भाजप कमजोर आहे. राज्यात जे नेते भाजपमध्ये आलेले आहेत ते काँग्रेस किंवा केसीआर यांच्या पक्षातून आलेले आहेत.