विंग कमांडर अभिनंदन यांचा आयएसआयने 40 तास केला होता छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 09:05 AM2019-05-16T09:05:36+5:302019-05-16T09:52:52+5:30
एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र....
नवी दिल्ली - एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन हे सुरुवातीला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांनी आयएसआय या कुख्यात गुप्तहेर संघटनेकडे सोपवण्यात आले होते.
संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांचे विमानही दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना ताब्यात घेऊन सुमारे चार तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना आयएसआयच्या ताब्यात देण्यात आले. आयएसआयचे अधिकारी त्यांना इस्लामाबाद येथून रावळपिंडी येथे घेऊन गेले. तिथे अभिनंदन यांना सुमारे 40 तास स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले. तिथे त्यांचा अनन्वित छळ करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला.
अभिनंदन यांना इस्लामाबाद येथून रावळपिंडी येथे नेताना डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. त्यामुळे त्यांना काहीही दिसत नव्हते. तसेच आयएसआयने त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्यांना मारहाण केली. त्यामुळे अभिनंदन यांच्या उजव्या डोळ्याभोवती काळ्या डागाचे निशाण तयार झाले आहे.
एकीकडे एवढी मारहाण होत असताना अभिनंदन यांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. मात्र भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यांच्यासंदर्भातील सर्व माहिती सांगून टाकली. दरम्यान, इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत अभिनंदन यांना मुक्त करण्याची घोषणा केली. मात्र आयएसआय अभिनंदन यांची सुटका करण्यास तयार नव्हती.
भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी दुसऱ्या दिवशी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानी लढाऊ विमानांचा हा हल्ला भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. मात्र या चकमकीदरम्यान अभिनंदन यांचे मिग विमान दुर्घटनाग्रस्त झाले. त्यामुळे अभिनंदन हे पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले होते.