अनंत आमुची ध्येयासक्ती! लवकरच पुन्हा विमान उडवायचंय; अभिनंदन यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 08:32 PM2019-03-03T20:32:13+5:302019-03-03T20:34:26+5:30
विंग कमांडर अभिनंदन यांना पुन्हा खुणावतंय आकाश
नवी दिल्ली: पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान जमीनदोस्त करणारे, जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशाची ओढ कायम आहे. पाकिस्तानी सैन्याला कोणतीही माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांनी पुन्हा एकदा कॉकपिटमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली. मला लवकरच विमान उडवायचं आहे, अशी भावना अभिनंदन यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.
नवी दिल्लीतल्या सैन्याच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अभिनंदन यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि वरिष्ठ कमांडोंनी अभिनंदन यांची भेट घेतली. यानंतर वरिष्ठ कमांडो आणि डॉक्टरांकडे अभिनंदन यांनी लवकरात लवकर विमान उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानी हवाई दलाविरुद्ध संघर्ष सुरू असताना अभिनंदन यांनी एफ-16 हे अत्याधुनिक विमान जमीनदोस्त केलं. अभिनंदन हे एफ-16 विमान पाडणारे भारतीय हवाई दलाचे पहिले वैमानिक आहेत.
Minister of State for Defence Subhash Rao Bhamre met IAF Wing Commander #AbhinandanVarthaman at Army Hospital Research And Referral in Delhi, today. pic.twitter.com/cCwNKoaBTi
— ANI (@ANI) March 3, 2019
27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या कचाट्यात सापडलेल्या अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं पाकिस्तानवर जगभरातून दबाव आणला. यानंतर 1 मार्चला अभिनंदन यांची सुटका झाली. वाघा बॉर्डरवरुन ते मायदेशी परतले. त्यावेळी त्यांचं एखाद्या नायकाप्रमाणे जल्लोषात स्वागत झालं. यानंतर त्यांना उपचारांसाठी सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांची काळजी घेत आहे. अभिनंदन लवकर कॉकपिटमध्ये परतावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.
अभिनंदन यांचं मिग 21 विमान कोसळल्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांच्या हाती लागले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याकडे असणारी गोपनीय कागदपत्रं नष्ट केली. पाकिस्तानी सैन्यानं अभिनंदन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांनी कोणतीही गोपनीय माहिती सांगितली नाही. एफ-16 विमान पाडणाऱ्या आणि जवळपास 58 तास पाकिस्तानच्या ताब्यात असताना कोणतीही गोपनीय माहिती न देणाऱ्या अभिनंदन यांच्या कामगिरीची चर्चा सध्या देशात सर्वत्र सुरू आहे.