विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डर येथून भारतात परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 07:07 PM2019-02-28T19:07:42+5:302019-02-28T19:08:27+5:30
पाकिस्तानने केलेला हवाई हल्ला परतवून लावताना विमान कोसळून तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची मुक्तता करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.
नवी दिल्ली - पाकिस्तानने केलेला हवाई हल्ला परतवून लावताना विमान कोसळून तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची मुक्तता करण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. आता अभिनंदन वर्धमान हे शुक्रवारी मुक्तता झाल्यानंतर वाघा बॉर्डर येथून मायभूमीत परतणार आहेत.
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत केली होती. ''भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत,'' असे इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा करताना सांगितले.
बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलण्यात आली असून, त्यासंदर्भात पाकिस्तानशीही संपर्क साधण्यात आला होता.