पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन यांची वीरचक्रसाठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 08:56 PM2019-04-20T20:56:58+5:302019-04-20T21:13:03+5:30
नवी दिल्ली - पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मर्दुमकी गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना यांना वीर ...
नवी दिल्ली - पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मर्दुमकी गाजवणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना यांना वीर चक्र देण्यात यावे अशी शिफारस हवाई दल केंद्र सरकारकडे करणार आहे. दरम्यान, अभिनंदन हे कर्तव्यावर असलेल्या काश्मीर खोऱ्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांना पश्चिम विभागातील एखाद्या महत्त्वपूर्ण हवाई तळावर नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील बालाकोट येथे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननने विमाने पाठवून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते. मात्र त्यावेळी विमानात झालेल्या बिघाडामुळे अभिनंदन हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यांनी गाजवलेल्या मर्दुमकीसाठी वीर चक्र देण्यात यावे, अशी शिफारस हवाई दलाकडून करण्यात येणार आहे.
IAF recommending Wg Cdr Abhinandan for wartime gallantry award 'Vir Chakra'
— ANI Digital (@ani_digital) April 20, 2019
Read @ANI Story | https://t.co/EZh7ETO69Hpic.twitter.com/Ae9mh52QEB
विंग कमांडर अभिनंदन यांच्या बदलीबाबत माहिती देताना सरकारी सूत्रांनी सांगितले की, विंग कमांडर अभिनंदन यांच्या बदलीचे पत्रक तयार कण्यात आले आहे. लवकरच श्रीनगर हवाई तळावरून नव्या ठिकाणी पाठवण्यात येईल.'' अभिनंदन यांच्या बदलीच्या ठिकाणाचा उलगडा करण्यात आला नसला तरी त्यांना हवाई तळावरच नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच विमान उडवण्यासाठी ते सक्षम आहेत, हे सिद्ध झाल्यास त्यांना विमान उड्डाण करण्याची परवानगीही देण्यात येणार आहे.
27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या कचाट्यात सापडलेल्या अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने पाकिस्तानवर जगभरातून दबाव आणला. यानंतर 1 मार्चला अभिनंदन यांची सुटका झाली. वाघा बॉर्डरवरुन ते मायदेशी परतले. त्यावेळी त्यांचं एखाद्या नायकाप्रमाणे जल्लोषात स्वागत झाले होते.