विंग कमांडर अभिनंदन यांच्या पाठीच्या कण्याला, बरगड्यांना दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 07:22 PM2019-03-03T19:22:55+5:302019-03-03T19:26:50+5:30
अभिनंदन यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू
नवी दिल्ली: मिग 21 विमान पाकव्याप्त काश्मीर कोसळल्यानंतर जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन दोन दिवसांपूर्वी मायदेशात परतले. त्यांच्या पाठीच्या कण्याच्या खालील भागाला आणि बरगड्यांना इजा झाली असल्याचं वैद्यकीय चाचणीतून समोर आलं आहे. लष्कराच्या रुग्णालयात अभिनंदन यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. एमआरआय स्कॅनमध्ये कोणतीही दुखापत दिसलेली नाही. मात्र पाठीच्या कणाच्या खालील भागाला इजा झाली आहे. मिग 21 विमान कोसळत असताना अभिनंदन पॅराशूटच्या मदतीनं बाहेर पडले. जमिनीवर येत असताना त्यांना ही दुखापत झाली असण्याची शक्यता आहे.
पॅराशूटच्या मदतीनं जमिनीवर उतरल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांनी अभिनंदन यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. अभिनंदन यांनी स्थानिकांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि धावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेतलं. मात्र त्याआधी अभिनंदन यांनी मोठ्या शिताफीनं त्यांच्याजवळ असणारी कागदपत्रं नष्ट केली.
अभिनंदन यांची आणखी काही वैद्यकीय चाचण्या शिल्लक आहेत. 27 फेब्रुवारीला विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचं एफ-16 विमान जमीनदोस्त केलं. त्यावेळी अभिनंदन मिग 21 विमान चालवत होते. यानंतर पाकिस्तानी हवाई दलानं अभिनंदन यांच्या विमानाला लक्ष्य केलं. त्यामुळे त्यांना पॅराशूटमधून खाली उतरावं लागलं. अभिनंदन 1 मार्चला मायदेशी परतले.