ताशी १८० किमी वेगाने धावली विनाइंजिन ‘ट्रेन-१८’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:46 AM2018-12-04T04:46:51+5:302018-12-04T04:46:57+5:30
‘इंटेग्रल कोच फॅक्टरी’ने (आयएफसी) उत्पादित केलेल्या ‘ट्रेन १८’ या भारतातील पहिल्या विनाइंजिनच्या रेल्वेगाडीने ताशी १८० किमीहून अधिक वेगाने धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
नवी दिल्ली : ‘इंटेग्रल कोच फॅक्टरी’ने (आयएफसी) उत्पादित केलेल्या ‘ट्रेन १८’ या भारतातील पहिल्या विनाइंजिनच्या रेल्वेगाडीने ताशी १८० किमीहून अधिक वेगाने धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही गाडी प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेच्या सेवेत रुजू झाल्यावर ती देशातील सर्वात वेगवान रेल्वेगाडी ठरेल. ताशी १६० किमी वेगाने धावणारी ‘गतिमान’ ही देशातील सर्वात वेगवान रेल्वे आहे.
‘आयएफसी’चे महाव्यवस्थापक एस. मणी यांनी सांगितले की, राजस्थानात कोटा-सवाई माधोपूर मार्गावर घेतलेल्या चाचणीत ‘ट्रेन-१८’ने ताशी १८० किमी वेगाची मर्यादा पार केली. आणखी चाचण्या झाल्यावर या गाडीचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरू होईल. अशा चाचण्यांना तीन महिने लागतात; परंतु ‘ट्रेन-१८’च्या चाचण्या तुलनेने वेगाने पूर्ण झाल्या. या गाडीच्या व्यापारी सेवा जानेवारीपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. रूळ व सिग्नल यंत्रणाही अनुरूप असेल, तर ही गाडी ताशी २०० किमीचा वेगही गाठू शकेल. ‘आयएफसी’ने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत या अत्याधुनिक रेल्वेगाडीचे उत्पादन केले आहे. गाडीचा उत्पादन खर्च १०० कोटी रुपये आहे.
> गुणवैशिष्ट्ये
१६ डब्यांच्या गाडीची प्रवासीक्षमता ‘शताब्दी एक्स्प्रेस’एवढी.
‘शताब्दी’च्या तुलनेत प्रवासाचा वेळ १५ टक्के कमी.
‘सेमी हाय स्पीड’ गाडी पूर्णपणे वातानुकूलित.
वेगळे इंजिन नाही. ‘इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिटस्’ (ईएमयू) तंत्रज्ञानावर आधारित.
इंधनाचीही मोठी बचत.
मुंबईसह अन्य काही शहरांमध्ये उपनगरी लोकल गाड्या अशाच ‘ईएमयू’ तंत्रज्ञानावर चालणाऱ्या असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हे तंत्रज्ञान प्रथमच उपयोगात आणले जात आहे.