योगींविरुद्ध जिंकले तर जायंट किलर ठरणार, अन्यथा झीरो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:41 AM2022-01-24T06:41:50+5:302022-01-24T06:42:18+5:30
पहिली निवडणूक लढणारे चंद्रशेखर आझाद
शरद गुप्ता
नवी दिल्ली : डोक्यावर निळी पगडी, गळ्यात निळे वस्त्र, चेहऱ्यावर रेबॅनचा गॉगल, भाषणांमध्ये आग... हा आहे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लढणारे चंद्रशेखर आझाद यांचा संक्षिप्त परिचय. त्यांची स्टाईल व स्वॅगचे दलित युवक चाहते आहेत. महाराष्ट्रात १९७२मध्ये दलित पँथरने जशी चेतना जागविली होती, तशीच चेतना ते उत्तर प्रदेशच्या दलितांमध्ये जागवू इच्छित आहेत. त्यावेळी महाराष्ट्रात डॉ. आंबेडकर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रभाव कमी झालेला होता. चंद्रशेखर यांचा उदयही उत्तर प्रदेशात अशाच स्थितीत झालेला आहे.
उत्तराखंडच्या सीमेवरील छुटमलपूर येथील गोवर्धन दास यांचे पुत्र चंद्रशेखर हे बालपणापासूनच बंडखोर स्वभावाचे. त्यांनी आपल्या गावाबाहेर स्वागताबद्दल एक बोर्ड लावला होता. तो उच्चवर्णीयांना आवडला नव्हता. परंतु त्यांनी पर्वा केली नाही. २०१५मध्ये त्यांनी भीम आर्मीची स्थापना केली. ते म्हणतात - देशाची आर्मी जशी नागरिकांचे रक्षण करते, तसे भीम आर्मी दलितांच्या हिताचे रक्षण करते. सहारणपूरमध्ये दलितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी ४०० भीम आर्मी स्कूलची स्थापना केली. यात मुले-मुली एकत्रित शिकतात. ठाकुरांच्या दादागिरीच्या विरोधात त्यांनी अनेकदा आंदोलने केली व जेलमध्येही गेले. त्यामुळेच त्यांनी आपल्या नावात रावण शब्दाला स्थान दिले. राजकारणात आल्यानंतर त्यांनी हे उपनाम हटविले. दुचाकीवरून गावोगावी फिरून ते दलितांमध्ये त्यांच्या अधिकारांची जागृती करतात.
एक पाय जेलमध्ये...
मागील पाच वर्षांत दलितांच्या हितांसाठी आंदोलने केल्यामुळे चंद्रशेखर आझाद यांचा एक पाय जेलमध्ये राहिलेला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची अटक राजकीय असल्याची टिप्पणी करून सुटका करण्याचा आदेश दिला तर योगी सरकारने त्यांना एनएसएनुसार पुन्हा अटक केली होती.
पोलिसांच्या हातावर तुरी दिल्यानंतर गोल टोपी घालून व शेरवानी परिधान करून ज्या पद्धतीने ते दिल्लीच्या जागा मशिदीत भाषण देण्यासाठी गेले, त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.
करा किंवा मरा...
आजवर त्यांचे कार्यक्षेत्र सहारणपूर व परिसरातील काही जिल्हे होते. मार्च २०२०मध्ये त्यांनी आझाद समाज पार्टीची स्थापना केली. परंतु आजवर एकही निवडणूक लढविली नाही. ते प्रथमच संपूर्ण राज्यात निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहेत. उत्तर प्रदेशचा जिग्नेश मेवानी त्यांना व्हायचे आहे. ३५ वर्षीय चंद्रशेखर यांच्यासाठी करा किंवा मरा, असा हा क्षण आहे. यशस्वी झाले तर हीरो अन्यथा झीरो बनणे निश्चित आहे.