Winter Olympics: भारताचा ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर बहिष्कार, अमेरिकेकडून मिळाले समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:01 PM2022-02-04T13:01:06+5:302022-02-04T13:01:20+5:30
Winter Olympics: चीनने 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याविरुद्ध लढलेल्या एका सैनिकाला मानाची मशाल पकडण्याचा बहुमान दिला. भारताने चीनच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.
नवी दिल्ली: आजपासून बीजिंगमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympics) स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर भारतीय डिप्लोमॅट्सने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने गुरुवारी जाहीर केले की उद्घाटन आणि समारोप समारंभात भारत प्रतिनिधित्व कराणार नाही. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचे अमेरिकेने समर्थन केले आहे.
"I applaud India for joining diplomatic boycott of the Beijing Olympics. We stand with all countries that reject the CCP’s heinous human rights abuses & cold-blooded effort to turn Olympics 2022 into a political victory lap," says Chairman, US Senate Foreign Relations Committee. pic.twitter.com/LoLcl2FyLC
— ANI (@ANI) February 4, 2022
अमेरिकन सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे अध्यक्ष म्हणाले, 'बीजिंग ऑलिम्पिकवरील राजनैतिक बहिष्कारात भाग घेतल्याबद्दल मी भारताचे कौतुक करतो. सीसीपीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन नाकारणाऱ्या आणि 2022च्या ऑलिम्पिकला राजकीय विजयात बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व देशांसोबत आम्ही उभे आहोत."
चिनी कमांडर ऑलिम्पिकमध्ये मशाल वाहक असेल
चीनने 2020 मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याविरुद्ध लढलेल्या एका सैनिकाला मानाची मशाल पकडण्याचा बहुमान दिला. गलवान खोऱ्यात चिनी जवानांचा मुकाबला करताना भारताचे 20 जवान शहीद झाले होते. अशा वेळी हिवाळी ऑलिम्पिकमध्ये गलवान खोऱ्यात लढलेल्या सैनिकाला हा मान देणं हे अयोग्य असून काही अंशी भारताचा चिथावण्याचा प्रयत्न असल्याचं मानल जात आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने आज डिप्लोमॅट्सबद्दलचा निर्णय जाहीर करताना चीनच्या या खेळीची निंदा केली. महत्त्वाची बाब म्हणजे, चीनकडे यजमानपद असताना भारतीय डिप्लोमॅट्स महत्त्वाच्या दोन्ही समारंभांना हजर नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे पडसाद उमटतील असे मत काही जाणकार व्यक्त करत आहेत.