Winter Session : अखेर संसदेतही तीन कृषी कायदे रद्द, विरोधकांचा गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:50 PM2021-11-29T12:50:24+5:302021-11-29T13:01:35+5:30
नवे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देशात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन सुरू आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेद्र मोदींनी अखेर गुरू नानक जयंतीदिनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली
नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत संमती देण्यात आली. त्यानंतर, संसदेच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, कुठल्याही चर्चेविना हे तिन्ही कायदे रद्द करण्यात आल्याने विरोधकांनी संसद सभागृहात गोंधळ घातला होता. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या कायद्यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता.
लोकसभा में विपक्षी सांसदों की नारेबाजी के बीच केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर ने कृषि क़ानून निरसन विधेयक 2021 पेश किया।
— ANI_HindiNews (@AHindinews) November 29, 2021
(सोर्स: संसद टीवी) pic.twitter.com/6pmLzpMPlK
नवे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देशात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन सुरू आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेद्र मोदींनी अखेर गुरू नानक जयंतीदिनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली. हा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करून तयार केला. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी संमती देण्यात आली होती. त्यानंतर, आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत हे तिन्ही कायदे रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, लोकसभा विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र, चर्चेविना हे तिन्ही कायदे रद्द करण्यात आले.
विपक्षी सांसदों के हंगामे के बीच लोकसभा में कृषि क़ानून निरसन विधेयक, 2021 पारित हुआ।
— ANI_HindiNews (@AHindinews) November 29, 2021
लोकसभा में कांग्रेस नेता अधीर रंजन चौधरी ने सदन में विधेयक पर चर्चा की मांग की थी। pic.twitter.com/HwNVN4K5Zq
दरम्यान, काँग्रेस नेते आणि प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चर्चेविना हे तिन्ही कायदे रद्द करण्यात आले आहेत. जर, चर्चा झाली असती, तर उत्तर द्यावे लागले असते, हिशोब द्यावा लागला असता, असे म्हणत सुरजेवाला यांनी सरकारवर टीका केली.
तोपर्यंत माघार नाही - टीकैत
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले होते की, जोपर्यंत संसदेतील दोन्ही सभागृहांत नवे कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक संमत होऊन त्याची सूचना राजपत्रात प्रसिद्ध होणार नाही, तोवर आमचा मोदी यांच्या शब्दांवर विश्वास बसणार नाही. शेतकरी आज संसदेवर ट्रॅक्टर मोर्चाही काढणार आहेत.
आता सहा मागण्यांकडे लागले लक्ष
- किमान हमी भावासाठी केंद्र सरकारने कायदा करावा, यासह सहा मागण्या संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या खुल्या पत्रात केल्या होत्या.
- शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे मोदी सरकार झुकले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतर केली.