संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:43 AM2017-11-23T04:43:36+5:302017-11-23T04:44:16+5:30
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर बुधवारी जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर सातत्याने आरोप आणि टीका केली होती.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर बुधवारी जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर सातत्याने आरोप आणि टीका केली होती. तीन आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनात १४ दिवस कामकाजाचे असतील. नाताळ आणि नूतन वर्षाच्या सुट्यांमुळे अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवसांनी कमी होईल. सत्र १५ डिसेंबरला सुरू होऊन पाच जानेवारीला संपेल. अर्थमंत्री अरूण जेटली शास्त्रीभवनमध्ये तारखा जाहीर करताना म्हणाले की, अधिवेशन घेण्यापासून सरकार काही पळ काढत नाही. सगळ््या प्रश्नांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. यापूर्वीही संसदेचे अधिवेशन देशात या नाही तर त्या भागातील निवडणुकांमुळे विलंबाने सुरू झाले किंवा त्यांचा कालावधी कमी केला गेला आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर हल्ला चढवत म्हटले होते की, ‘तुम्ही सत्य लपवले तरी ते दूर जाऊ शकत नाही. मोदी जी, लपणे बंद करा आणि संसद सुरू करा म्हणजे तुम्ही राफेल विमानांच्या व्यवहाराचे जे काही केले ते सगळा देश ऐकेल.’
पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान काही ठिसूळ कारणे सांगून हिवाळी अधिवेशन होऊ देत नाहीत. हा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावताना जेटली यांनी दावा केला की, निवडणुका व संसद अधिवेशन एकाचवेळी येऊ नये यासाठी अधिवेशनाचे वेळापत्रक बदलून घेतले गेले आहे व स्वत: काँग्रेसने तसे अनेक वेळा केले आहे.
>जेटली म्हणाले...
अधिवेशनाचा कालावधी असा असेल की, ते आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी असणार नाहीत व अधिवेशन नियमित अधिवेशन असेल, असे जेटली म्हणाले. सामान्यत: निवडणुका आणि संसदेचे अधिवेशन एकमेकांच्या मध्ये येत नाहीत, असे जेटली यांनी प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.