हिवाळी अधिवेशन: सातारकरांसाठी पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत उचलला 'हा' मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:26 PM2019-11-18T14:26:34+5:302019-11-18T14:27:43+5:30

शरद पवारांचे जीवलग मित्र म्हणून महाराष्ट्रात पाटील यांची ओळख आहे.

Winter Session: Srinivas Patil raises 'issue' in Lok Sabha on first day for Satara | हिवाळी अधिवेशन: सातारकरांसाठी पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत उचलला 'हा' मुद्दा 

हिवाळी अधिवेशन: सातारकरांसाठी पहिल्याच दिवशी श्रीनिवास पाटलांनी लोकसभेत उचलला 'हा' मुद्दा 

googlenewsNext

नवी दिल्ली - खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. अवघ्या तीन महिन्यात त्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनश्रीनिवास पाटील तर भाजपाकडून उदयनराजे भोसले उभे होते. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. 

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदारकीची शपथ घेतली. श्रीनिवास पाटील यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी लोसभेत एक मुद्दा मांडला. महाराष्ट्रातले खासदार, विशेषतः शिवसेनेचे खासदार शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित करत असताना श्रीनिवास पाटीलही याच मुद्यावर बोलायला उभे राहतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. 

पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी श्रीनिवास पाटील यांचं स्वागत केलं. अनेक दिवसांनंतर तुम्हाला ऐकण्याची संधी या सभागृहाला मिळाली आहे, असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील याचं स्वागत केलं. पाटील यांनी मग पीठासीन अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि म्हणाले की देशात केंद्रीय विद्यालयांची संख्या जर पाहिली तर सगळ्यात कमी संख्या ही महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यात अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना लष्करात जाण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी सातारा जिल्ह्यात कुठेही एक केंद्रीय विद्यालय सुरू करण्यात यावं, ही नम्र विनंती करतो  असं म्हणत त्यांनी आपलं लहानसं भाषण संपवलं. 

शरद पवारांचे जीवलग मित्र म्हणून महाराष्ट्रात पाटील यांची ओळख आहे. पाटील हे यापूर्वीही दोनवेळा खासदार राहिले असून सिक्कीमचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी विकासाची कामं करण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे म्हटले होते. परंतु हे सबळ कारण नव्हते. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मत द्यावं अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती. त्यामुळे मी बहुमताने निवडून आलो, असे पाटील यांनी आपल्या विजयानंतर म्हटले होते. दरम्यान, उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात केलेला प्रवेश लोकांना रुचला नाही. तसेच, शरद पवारांची पावसातील सभा साताऱ्यातील निवडणुकीत निर्णायक ठरल्याचंही अनेकांच मत आहे. 
 

Web Title: Winter Session: Srinivas Patil raises 'issue' in Lok Sabha on first day for Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.