तारांचे कुंपण शिडीने ओलांडून आले होते अतिरेकी
By admin | Published: October 17, 2016 05:26 AM2016-10-17T05:26:30+5:302016-10-17T05:26:30+5:30
१९ जवानांना ठार मारणारे चार पाकिस्तानी दहशतवादी नियंत्रण रेषेवरील वीजपुरवठा सोडलेले (इलेक्ट्रिफाईड फेन्स) तारांचे कुंपण शिडीने चढून आले होते.
उरी/नवी दिल्ली : काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या छावणीवर हल्ला करून १९ जवानांना ठार मारणारे चार पाकिस्तानी दहशतवादी नियंत्रण रेषेवरील वीजपुरवठा सोडलेले (इलेक्ट्रिफाईड फेन्स) तारांचे कुंपण शिडीने चढून आले होते. या हल्लेखोरांनी नेमका कोठून प्रवेश केला असेल याची चौकशी लष्कर करीत असताना सलामाबाद नाल्यानजीक त्यांनी शिडीचा वापर केल्याचे स्पष्ट झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
श्रीनगरपासून १०२ किलोमीटरवर उरी आहे. चारपैकी एक दहशतवादी सलामाबाद नाल्यानजिक तारांच्या कुंपणात असलेल्या अंतरातून आत शिरला व त्याने कुंपणाच्या भारताच्या बाजुकडून शिडी उभी केली. पाकिस्तानच्या बाजुकडून तीन दहशतवाद्यांनीही शिडी लावली. दोन शिड्यांना एकत्र जोडून पायी चालण्यासारखा पूल म्हणून त्याचा वापर झाला.
पहिल्या दहशतवाद्याने ज्या मोकळ््या जागेतून भारतात प्रवेश केला त्यामार्गाने उर्वरीत तिघांनीही आत येणे अशक्य होते. कारण त्या प्रत्येकाकडे दारुगोळा, स्फोटके व हत्यारे तसेच खाद्यपदार्थांनी जड झालेल्या व पाठीवर वाहून नेता येतील अशा बॅगा होत्या. त्या सगळ््यांना कुंपणाला ओलांडून येण्यास खूप वेळ लागला असता व त्यांचा जीवालाही धोका होता कारण नियमित गस्तीवर असलेल्या लष्कराला ही घुसखोरी लक्षात आली असती, असे सूत्रांनी म्हटले. भारतीय भागात चार दहशतवादी शिरल्यानंतर पहिल्या दहशतवाद्याने वाहून आणलेली शिडी महंमद कबीर अवान आणि बशारत या मार्गदर्शकाकडे (हे दोघे नियंत्रण रेषेपर्यंत चौघांसोबत आले होते) सोपविली गेली, असे या सूत्रांनी म्हटले. शिवाय कोठेही काही वाईट नाही हे सूचित करण्यासाठीही असे करण्यात आल्याचे हे सूत्र म्हणाले.
या दहशतवाद्यांनी लष्करी तळावर १८ सप्टेंबरच्या रात्री प्रत्यक्ष हल्ला करायच्या आधी एखादा दिवस गोहल्लान आणि त्याला लागून असलेल्या जब्लाह खेड्यात आश्रय घेतला होता का याची चौकशी लष्कर करीत आहे. १९ जवानांचा या हल्ल्यांत मृत्यू झाला व मोठ्या प्रमाणावरील दारुगोळा व शस्त्रास्त्रांचे नुकसान झाले. यावर्षीच्या प्रारंभी उत्तर काश्मीरच्या मछिल विभागात दहशतवाद्यांनी कुंपण ओलांडण्यासाठी शिडीचा वापर केल्याचे प्रथमच उघड झाले होते.
लष्कराने अंतर्गत चौकशी सुरू केल्यानंतर उरीचे ब्रिगेड कमांडर के. सोमा शंकर यांना काढून टाकले. दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष हल्ला करायच्या आधी किमान एक दिवस तरी त्या भागात प्रवेश केला असावा, असे प्राथमिक चौकशीतून सूचित होते आहे. ही चौकशी निश्चित दिवसांत केली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
।लष्करी तळाची माहिती त्यांना होती...
नियंत्रण रेषेला जवळ असलेल्या या लष्करी तळाची चांगली माहिती व रचना (आराखडा) दहशतवाद्यांना माहीत असावी, असे दिसते. दहशतवाद्यांनी तळावर असलेल्या जवानांना बाहेर पडता येऊ नये म्हणून स्वयंपाक घर आणि भांडारच्या खोलीला बाहेरून कड्या घातल्या व मग त्याला पेटवून दिले. हे चार दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून १६ व १७ सप्टेंबरच्या रात्री शिरले व सुखधर खेड्यात मुक्कामाला असावेत व त्यांनी तेथून या लष्करी तळाची पाहणी केली, असे चौकशी करणाऱ्यांनी म्हटले.