सुषमा स्वराज तुम्ही आमच्या पंतप्रधान हव्या होत्या; पाकिस्तानी महिलेचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 12:04 PM2017-07-28T12:04:17+5:302017-07-28T12:39:27+5:30
एका पाकिस्तानी महिलेने सुषमा स्वराज यांच्यासाठी ट्विट केलं आहे. या महिलेने ट्विटमध्ये सुषमा स्वराज पाकिस्तानच्या पंतप्रधान असण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली, दि. 28- ट्विटरवर लोकांनी पोस्ट केलेल्या समस्यांचं तात्काळ निवारण करत असल्याने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नेहमीच चर्चेत असतात. तात्काळ मदतीच्या सुषमा स्वराज यांच्या वृत्तीमुळे त्यांनी हजारो लोकांची मनं जिंकली आहेत. सुषमा स्वराज यांची ही ख्याती फक्त भारतातच नसून भारताबाहेरही असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका पाकिस्तानी महिलेने सुषमा स्वराज यांच्यासाठी ट्विट केलं आहे. या महिलेने ट्विटमध्ये सुषमा स्वराज पाकिस्तानच्या पंतप्रधान असण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'तुम्हाला खूप सारं प्रेम आणि आदर. जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असत्या तर आमचा देश आज बदलला असता', असं ट्विट पाकिस्तानी महिला हिजाब आसिफ यांनी केलं आहे.
Lots and lost of love and respect from here. Wish you were our Prime Minister, this country would've changed!
— Hijaab asif (@Hijaab_asif) July 27, 2017
पाकिस्तानमधील एका व्यक्तीला उपचारासाठी भारतात यायचं होतं. पण त्या व्यक्तीचं वैद्यकिय व्हिजासाठीचा अर्ज अडकून पडला होता. या व्यक्तीच्या मदतीसाठी हिजाब आसिफ यांनी ट्विटरवर सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. सुषमा स्वराज यांनी हिजाबला नाराज न करता लगेचच कारवाई करत भारतीया दूतावासाला या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले. भारतीया दूतावासाने एक ट्विट करत हिजाबला आश्वासन दिलं की त्यांची विनंती लक्षात ठेवून कारवाई केली जाते आहे. सुषमा स्वराज यांनी हिजाब यांच्या मदतीसाठी दाखवलेली तत्परता हिजाबला चांगलीच भावली आणि तिने आनंदीत होऊन ट्विट केलं. एका दुसऱ्या ट्विटमध्ये सुषमा स्वराज यांचे आभार मानताना हिजाबने म्हंटलं आहे. तुम्हाला मी नेमकं काय म्हणू ? सुपरवूमन म्हणू की देव म्हणू ? तुम्ही केलेल्या मदतीसाठी आभार मानायला मला शब्द कमी पडत आहेत. तुम्हाला खूप प्रेम. आज तुम्हाला धन्यवाद देताना माझ्या डोळ्यात आनंदाश्रृ आहेत आणि माझं तोंड तुमची सुस्ती करणं बंद करत नाहीये.
@SushmaSwaraj what do I call you? Superwoman? God? No words to describe your generosity! Love you maam Can't stop praising you in tears!🙏🏻❤️
— Hijaab asif (@Hijaab_asif) July 27, 2017
या आठवड्याच्या सुरूवातीला एका भारतीय नागरीकाने त्याच्या पाकिस्तानी पत्नीच्या व्हिजासाठी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. त्या व्यक्तीच्या विनंतीवर सुषमा स्वराज यांनी दिलेलं उत्तरही चर्चेचा विषय ठरलं होतं. 'भारताच्या मुली आणि पाकिस्तानसहीत दुनियेच्या कोणत्याही भागातून येणाऱ्या सुनांचं या देशात नेहमीच स्वागत आहे', असं स्वराज म्हणाल्या होत्या.
दरवर्षी अनेक पाकिस्तानी नागरीक भारतात उपचारासाठी येतात. पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली गेल्यानंतर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे वैद्यकिय विजाला मंजूरी देणारी प्रक्रिया संथ गतीने होत होती.
ओसामाला दिला व्हिसा
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये राहणारा 24 वर्षीय ओसामा अली याला उपचारासाठी भारतात यायचं आहे. मात्र त्याला पाकिस्तानकडून कोणतीही परवानगी दिली जात नव्हती ओसामाच्या यकृतामध्ये गाठ असून उपचारासाठी त्याला दिल्लीला यायचं आहे. यासाठी नियमांचं पालन करत प्रक्रियेप्रमाणे त्याला सरताज अजीज यांना पत्र लिहायचं होतं, आणि ते पत्र भारतीय दुतावासामध्ये द्यायचं होतं. पण त्याने असं काही केलं नाही, त्यामुळे व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण होत होती. अशावेळी सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेत ओसामाला मदत केली. त्यांनी ओसामाला कोणत्याही पत्राविना उपचारासाठी मेडिकल व्हिसा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वी सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी नागरिकांना भारतात उपचारासाठी यायचं असले तर सरताज अझीझ यांचं पत्र आणणं अनिवार्य असल्याचं सांगितलं होतं. पत्र आणल्यास तात्काळ व्हिसा देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र या प्रकरणात सुषमा स्वराज यांनी कोणत्याही पत्राविना व्हिसा देण्याचा निर्णय घेतला.