इमान लफड्यांशी... क्रिकेटर, माजी पंतप्रधान ७० वर्षांचा झाला तरी... सुधरला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 12:41 PM2023-05-21T12:41:38+5:302023-05-21T12:42:02+5:30
मुद्द्याची गोष्ट : इम्रान खान हे लफडेबाज आहेत, ही प्रतिमा त्यांच्या राजकारण व वैयक्तिक आयुष्यातील घटनांनी अधिक ठळक झाली आहे.
- समीर परांजपे, मुख्य उपसंपादक
तरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देदीप्यमान यश इम्रान खान यांनी राजकारणाच्या खेळपट्टीवर पंतप्रधानपद मिळवून एकदाच मोठी कामगिरी केली. पण त्यांची बाकीची कामगिरी सुमारच राहिली. इम्रान खान है। लफडेबाज आहेत ही प्रतिमा त्यांच्या राजकारण व वैयक्तिक आयुष्यातील घटनांनी अधिक ठळक झाली. अविवाहित असताना त्यांची अनेक मुलींबरोबर प्रेमप्रकरणे होती, असे म्हटले जायचे. अगदी झीनत अमानशीदेखील त्यांचे नाव जोडले गेले.
इम्रान खान यांनी १६ मे १९९५ रोजी जेमिमा गोल्डस्मिथ हिच्याशी काहीशा गुप्तपणे विवाह केला. त्यानंतर २१ जून रोजी लंडनमध्ये पुन्हा एकदा जेमीमाशीच लग्नगाठ बांधली. अशा रितीने दोनदा तिच्याशी विवाह करण्याचे कारण त्यांनी कधीही उघड केले नाही. या लग्नातून इम्रानला दोन मुले झाली. पण मुळात बाहेरख्याली असलेले इम्रान हे पत्नीशी एकनिष्ठ राहणे शक्यच नव्हते. या दाम्पत्याचा २२ जून २००४ रोजी घटस्फोट झाला. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये इम्रान यांनी पत्रकार रेहम खान यांच्याशी विवाह केला. पण त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये ह्या दोघांनी काडीमोड घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याने बुशरा बिबीशी विवाह केला. तो अजून तरी टिकला आहे. वयाच्या ७०व्या वर्षीही इम्रान यांची महिलांविषयीची आसक्ती कमी झालेली नाही, असे पाकिस्तानी प्रसारमाध्यमातूनच प्रसिद्ध होत असते.
इम्रान खान १८ ऑगस्ट २०१८ रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान झाले व १० एप्रिल २०२२ रोजी त्यांना या पदावरुन पायउतार व्हावे लागले. ते पंतप्रधान झाले तेव्हा नवीन पाकिस्तान निर्माण करण्याच्या वल्गना त्यांनी केल्या होत्या. पण त्यांचे सारे राजकारण हे भारतद्वेष आणि पाकिस्तान लष्कराचा पाठिंबा या दोन गोष्टींवरच आधारित होते. मात्र, सत्ता गेल्यानंतर त्यांच्यात एक आश्चर्यकारक बदल झाला आहे. भारतातील लोकशाही राजवट, भारताने केलेली प्रगती याबद्दल ते चांगले उद्गार काढताना दिसत आहेत. अर्थात काश्मीर प्रश्नाचे तुणतुणे वाजवायला ते अजिबात विसरत नाहीत. भारत प्रेमाची उबळ इम्रान यांना धूर्त हेतूशिवाय येणे अशक्यच आहे.
१९४७च्या फाळणीनंतर धर्माच्या आधारावर पाकिस्तान हे राष्ट्र जन्माला आले. त्या देशात तेव्हापासून ते आजवर सत्तेवर लष्कराचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अंकुश राहिलेला आहे. त्या देशात लोकशाही फारशी रुजलेली नाही. इम्रान खान २०१८ साली पाकिस्तानचे पंतप्रधान झाले तेव्हाही त्यांना असलेला लष्कराचा पाठिंबा लपून राहिला नव्हता. आता ते खुशाल पाकिस्तानी लष्कराच्या
विरोधात गळा काढोत पण त्यांना आपला भूतकाळ कधीही विसरता येणार नाही. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात असून, आता तिथे राजकीय अस्थैर्यदेखील आहे. त्यात इम्रान यांच्या आंदोलनांनी भरच पडली आहे. सध्या इम्रान यांच्या विरोधातील महत्त्वाच्या गुन्ह्यांपैकी एक आहे तोपखाना प्रकरण. पाकिस्तानी पंतप्रधानाला विदेश दौऱ्यावर किंवा देशातही ज्या भेटवस्तू मिळतात त्या त्याने तोषखान्यात (सरकारी तिजोरी) जमा कराव्यात, असा नियम आहे. इम्रान यांनी आपल्याला मिळालेल्या भेटवस्तू तोषखान्यात जमा केल्या, पण नंतर पंतप्रधानपदाचा लाभ उठवत त्या वस्तू अतिशय कमी किमतीत खरेदी केल्या. त्यामुळे त्यांच्यावर पाकिस्तानी जनतेला व सरकारला फसविल्याचा खटला दाखल आहे. त्यांच्या अल् कादिर ट्रस्टला सुफी विद्यापीठ काढण्यासाठी जी जमीन मिळाली ती लाच होती. त्यामुळे पाकिस्तानचे ५० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप आहे. या प्रकरणाचे निमित करून मला १० वर्षे तुरुंगात धाडण्याचा लष्कराचा डाव आहे, असा आरोप त्यांनी नुकताच केला होता.
इम्रान खान यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या इमारतीतून निमलष्करी दलाच्या सैनिकांनी अटक केली. त्यानंतर इम्रान प्रमुख असलेल्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लष्करी इमारती तसेच अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ले केले. पाकिस्तानच्या आजवरच्या इतिहासातील ही अघटित घटना होती. इम्रान यांची इस्लामाबाद न्यायालयात झालेली अटक अवैध आहे, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मात्र, इम्रान यांच्यावर दहशतवाद, देशद्रोह, हिंसाचार अशा प्रकरणांत १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांची न्यायालयीन प्रकरणांतून सहजासहजी सुटका होणे तसे कठीणच आहे. इम्रान यांच्या लाहोर येथील घरात ३० ते ४० दहशतवादी लपल्याचा आरोप शाहबाझ शरीफ सरकारने केला हाता. यावरूनही वादंग उठले. ९ मे नंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांत त्यांना ३१ मेपर्यंत अटक करता येणार नाही, असा इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.
इम्रान यांनी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाची स्थापना केली. २०१८ साली सार्वत्रिक निवडणुकांत सर्वाधिक जागा मिळविणारा म्हणून त्यांचा पक्ष पुढे आला. मात्र, संपूर्ण बहुमत नसल्याने त्यांना आघाडी सरकार स्थापन करावे लागले होते. पंतप्रधान पद सोडल्यानंतर इम्रान व त्यांचा पक्ष संकटांच्या गर्तेत अधिक सापडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच जीवघेण्या हल्ल्यातून इम्रान सुदैवाने बचावले. ते विद्यमान पंतप्रधान शाहबाझ शरीफ व लष्कर यांच्याविरोधात एकचवेळी लढत आहेत. त्या संघर्षातून एकतर इम्रान यांना कारावासात पाठविले जाईल किंवा त्यांचा कायमचा काटा काढला जाईल. कारण असे होणे हा पाकिस्तानचा आजवरचा राजकीय इतिहास आहे. तोच पुन्हा लिहिला जाऊ शकतो.