भारताच्या समृद्धीने होईल जगाचीही प्रगती; उत्तर प्रदेश गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण, PM नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:03 AM2023-02-11T11:03:15+5:302023-02-11T11:04:59+5:30
उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत.
लखनऊ : भारत जगाला समृद्धी मिळवून देणार आहे. भारत समृद्ध झाला, तर जगाचीही प्रगती होईल. उत्तर प्रदेश हे परकीय गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे त्यांनी उद्घाटन केले. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देश-विदेशातील महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी व गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय समाजातील लोकांच्या आकांक्षा आता सरकारला वेगाने काम करण्यासाठी प्रेरित करत आहेत. त्यामुळे विकासाच्या कामांनाही गती आली आहे.
बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश यांचा फार विकास न झाल्याने, त्यांना पूर्वी ‘बिमारू’ राज्ये म्हटले जात असे. त्याचा संदर्भ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एके काळी बिमारू अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशने आता लोकांच्या मनात आशा निर्माण केली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत उत्तर प्रदेशने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता हे राज्य उत्तम कारभार, सुधारलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासाठी ओळखले जाते. त्यामुळे उद्योजकांना या राज्यात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योगपती मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, एन.चंद्रशेखरन यांचीही या परिषदेत भाषणे झाली.
रिलायन्सची गुंतवणूक ७५ हजार कोटींची
उत्तर प्रदेशमध्ये ५-जी मोबाइल सेवा, रिटेल नेटवर्क, अक्षय ऊर्जा या क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज येत्या चार वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा या उद्योगसमूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. या गुंतवणुकीमुळे उत्तर प्रदेशात अतिरिक्त एक लाख रोजगार उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.