महिनाभरात ‘आप’चा दुसरा आमदार अटकेत
By admin | Published: July 10, 2015 01:39 AM2015-07-10T01:39:36+5:302015-07-10T01:39:36+5:30
फसवणूक करीत जमीन हडपल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे आमदार मनोजकुमार यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली असता दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची
नवी दिल्ली : फसवणूक करीत जमीन हडपल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे आमदार मनोजकुमार यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली असता दिल्ली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. महिनाभरात दोन आमदारांची कारागृहात रवानगी झाल्याने केजरीवाल सरकारच्या अडचणीत भर पडली आहे.
पूर्व दिल्लीत कोंडली येथील आमदार असलेल्या मनोज कुमार यांना न्यू अशोकविहार पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली. आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत अटक केली असल्याचे पूर्व रेंजचे संयुक्त पोलीस आयुक्त संजय बेनीवाल यांनी सांगितले.
त्यांच्यावर कलम ४६८ (फसवणुकीच्या दृष्टीने बनावट दस्तऐवज बनविणे), ४७१ (बनावट दस्तऐवज अस्सल म्हणून वापरणे), ४२० (फसवणूक), १२० बी (गुन्हेगारी कट) ही कलमे लावण्यात आली आहेत. दिल्ली पोलिसांनी आणखी काही दस्तऐवज मिळवायचे असल्याचे सांगितल्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सौरभ प्रताप सिंग यांनी ११ जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)