लग्नानंतर महिन्याभरातच पतीने व्हॉट्स अॅपवरून दिला तलाख
By admin | Published: October 7, 2015 01:12 PM2015-10-07T13:12:15+5:302015-10-07T13:45:33+5:30
लग्नाला एक महिनाही उलटत नाही तोच केरळमधील एका नवविवाहितेला तिच्या पतीने व्हॉट्सअपवरून घटस्फोट दिला.
ऑनलाइन लोकमत
अल्लपुझा, दि. ७ - पत्नी ही सफरचंदाप्रमाणे असून तिचा आस्वाद मी घेतला आहे, आता पुन्हा तिच्यासोबत राहायचे नाही असे सांगत केरळमध्ये राहणा-या एका नवविवाहीतेला तिच्या पतीने चक्क वॉट्सअॅपव्दारे घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या तीन आठवड्यानंतरच पतीने थेट वॉट्स अॅपव्दारे घटस्फोट दिल्याने मुलीला धक्का बसला असून याप्रकरणी तिने केरळमधील महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.
अल्लपुझा येथे राहणा-या २१ वर्षीय तरुणीचा २७ वर्षीय तरुणाशी मोठ्या थाटामाटात निकाह झाला. लग्नाच्या तीन आठवड्यानंतर तिचा पती दुबईला कामावर परतला. दुबईत गेल्यावर तिने पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यात काहीच बोलणं होत नव्हते. काही दिवसांनी तिला पतीने व्हॉट्स अॅपवर तीन वेळा तलाक लिहून पाठवले. या प्रकाराने नवविवाहीतेला हादराच बसला.
या तरुणीच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले होते. मात्र तरीही तिच्या आईने कष्ट करून थाटामाटात तिचे लग्न लावून दिले. तिची लहान बहिण सध्या १२ वीत शिकते. सोमवारी पिडीत तरुणीने केरळमधील राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. महिला आयोगाने परदेशातील केरळ संघटनांच्या मदतीने पिडीत तरुणीच्या पतीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. काही इस्लामी संघटनांनी व्हॉट्स अॅपवर दिलेल्या घटस्फोटाचे समर्थन केले आहे. तर महिला संघटनांनी व्हॉट्स अॅपवर घटस्फोट देण्याच्या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.