‘ते’ निकाल घटनेच्या चौकटीतच, चंद्रचूड स्पष्टच बोलले; अयोध्या, कलम ३७० प्रकरणावर प्रथमच खुलेपणाने मांडली मते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 06:53 AM2024-01-02T06:53:29+5:302024-01-02T06:55:40+5:30
अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.
नवी दिल्ली : ‘अयोध्या प्रकरण, कलम ३७० यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीतच दिला,’ असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले.
अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायमूर्तींनी निर्णयात कोणत्याही न्यायमूर्तींचे नाव दिले जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतला होता, असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले. ‘या खटल्याला विविध दृष्टिकोनांचा, संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे व खंडपीठाचा भाग असलेल्या सर्वांनी ठरवले की, हा न्यायालयाचा निर्णय असेल. अंतिम निकालातच नव्हे तर निकालातील कारणांमध्येही आम्ही एकत्र आहोत, असा स्पष्ट संदेश देणे ही त्यामागची कल्पना होती,’ असे चंद्रचूड म्हणाले.
समलिंगी विवाह निकालाबद्दल...
सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मंजुरी देण्याबाबतची याचिका फेटाळल्याबद्दल चंद्रचूड यांनी सांगितले की, एखाद्या खटल्याचा निकाल हा न्यायाधीशांसाठी कधीही वैयक्तिक नसतो आणि त्याला त्याचा कोणताही पश्चात्ताप नसतो. आता या खटल्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तो विषय संपला आहे.
कलम ३७०च्या निकालावरील टीकेबद्दल
सरन्यायाधीशांनी घटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास नकार दिला. ‘न्यायाधीश संविधान आणि कायद्याच्या चौकटीत एखाद्या खटल्याचा निर्णय घेतात,’ असे ते म्हणाले.
कॉलेजियम व्यवस्थेबद्दल...
उच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती करणाऱ्या न्यायमूर्तींच्या कॉलेजियम प्रणालीत अधिक पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. कॉलेजियम प्रणालीमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.