कोरोनाची तमा न बाळगता गंगेला आला श्रद्धा व आस्थेचा पूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:39 AM2021-03-12T05:39:44+5:302021-03-12T05:40:41+5:30
‘बम भोले’ च्या गजरात हरिद्वार येथे पहिले शाही स्नान
किरण अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
हरिद्वार : महाशिवरात्रीच्या पर्वावर ‘बम भोले’ व ‘हर हर महादेव’ चा गजर करीत शैव पंथीय आखाड्याचे पहिले शाही स्नान येथे उत्साहात पार पडले. विशेष म्हणजे कोरोना विषयक निर्बंधांची भीती न बाळगता देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्रद्धेने व आस्थेने गंगा स्नानासाठी येथे दाखल झाले आहेत.
प्रयागराज नंतर हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभ स्नानाची पहिली पर्वणी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पार पडली, यात शैव पंथीय आखाड्यांनी शाही स्नान केले. महाराष्ट्रातील नाशिकच्या रामकुंडाप्रमाणे शाही स्नानाचे महत्त्व असलेल्या हरिद्वारच्या हर की पौडी येथे शाही स्नानाला प्रारंभ झाला, यात सर्वप्रथम श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या नेतृत्वात साधू संन्यासी यांनी स्नान केले. जुना आखाडा, आवाहन, अग्नी, निरंजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल आखाडा या आखाड्यांचे स्नान पार पडले. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरचे महंत शंकरानंद सरस्वती, आनंद आखाड्याचे सचिव महंत गणेशानंद सरस्वती, महंत गिरिजानंद, महंत रमेश गिरी (परभणी), अवधेश पुरी, सुमेर पुरी (हिंगोली), महामंडलेश्वर राहुलेश्वरानंद गिरी(वसई, मुंबई), महंत कैवल्यगिरी (बुलढाणा), महंत हरिओम पुरी (अकोला), महामंडलेश्वर सुरेंद्र गिरी (लातूर) योग आनंद गिरी (शेगांव), गिरिजानंद सरस्वती (आळंदी), ईश्वर आनंद ब्रह्मचारी (औरंगाबाद), अर्जुन पुरी (बीड), विष्णू भारती (गेवराई) आदी साधू-महंत आपापल्या भक्तांसमवेत या शाही स्नानात सहभागी होते. किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, पायल गिरी, रागिणी गिरी (नाशिक), यांच्या नेतृत्वात किन्नरही स्नानात सहभागी झाले.
मुख्यमंत्री पोहोचले स्वागताला
उत्तराखंडाच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ होताच हरिद्वार कुंभाला सामोरे जावे लागत असलेल्या तिरथ सिंह रावत यांनी सपत्नीक हर की पैडी येथील ब्रम्ह कुंडावर पोहोचून शाही स्नानासाठी आलेल्या विविध आखाड्याच्या संत महंतांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. उत्तराखंड राज्य शासनातर्फे शाही स्नानाच्या मिरवणुकांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली.
ईश्वराप्रती श्रद्धा व आस्था अतूट असली तर त्यातून व्यक्तीचे मनोबल बळकट होते. शासनाने खबरदारीच्या पुरेशा योजना केल्या असून या मनोबलाच्या बळावरच कोरोनासारख्या संकटाशी मुकाबला करून हरिद्वारचा कुंभ यशस्वी होईल असा विश्वास आहे.
- आचार्य महामंडलेश्वर,
श्री बालकानंद गिरी,
आनंद पीठाधीश्वर, हरिद्वार
वैष्णव पंथीय वृंदावनला यमुनातिरी
दरम्यान शैव पंथीयांचे हरिद्वारमध्ये स्नान होत असताना वैष्णव संप्रदायाच्या आखाड्यांनी वृंदावन मध्ये बैठक घेऊन यमुनेत पवित्र स्नान केले. यावेळी तिन्ही आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर व खालसा यांनी सहभाग घेतला.