इंजिनविना २० किमी धावली २२ डब्यांची रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:08 AM2018-04-09T02:08:33+5:302018-04-09T02:08:33+5:30
‘अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीचे २२ डबे इंजिनविना उलट्या दिशेने तब्बल २० किमीपर्यंत घरंघळत गेल्याची विचित्र घटना शुक्रवारी रात्री ओडिशामधील एका रेल्वे स्टेशनवर घडली.
भुवनेश्वर: ‘अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीचे २२ डबे इंजिनविना उलट्या दिशेने तब्बल २० किमीपर्यंत घरंघळत गेल्याची विचित्र घटना शुक्रवारी रात्री ओडिशामधील एका रेल्वे स्टेशनवर घडली.
शुक्रवारी रात्री ‘अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस’मधील या थरारनाट्यामुळे प्रवाशांचे प्राण कंठाशी आले, पण सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. गाडीच्या इंजिनचे शंटिंग करताना निष्काळजीपणा केल्याबद्दल दोन ड्रायव्हरसह सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे पूर्व सीमांत रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.
या सुमारे अर्धा तासाच्या थरारनाट्यात प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. ज्या दिशेने आली त्याच दिशेने गाडी पुन्हा उलटी जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अनेकांनी गाडी थांबविण्यासाठी साखळी ओढली. तरीही गाडी थांबली नाही तेव्हा काही तरी गडबड आहे याची जाणीव झाल्यावर प्रवाशांनी देवाचा धावा सुरु केला. परळीतही २० वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यावेळी मालगाडीचे डबे स्टेशनवर उभी असलेल्या एक्स्प्रेसवर आदळून अनेक जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)
>स्किड ब्रेक विसरले
एका बाजूचे इंजिन काढून दुसºया बाजूने जोडायचे असते, तेव्हा डब्यांना ‘स्किड ब्रेक’ लावून त्यांना स्थिर करायचे असते. या घटनेत तेच केले नसावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
दगडांद्वारे गाडी थांबविल्यानंतर कसिंगा येथे एक इंजिन पाठविण्यात आले. ते या गाडीला पुन्हा तितलागढ येथे घेऊन आले. दुसºया बाजूला इंजिन जोडून गाडीचा पुढचा प्रवास शनिवारी दुपारी १२.३५ च्या सुमारास सुरू झाला.
>कसे घडले हे थरारनाट्य?
गुरुवारी सायंकाळी अहमदाबादहून निघालेली
ही गाडी १,४६० किमीचे अंतर पार करून शुक्रवारी रात्री ९.३५ च्या सुमारास ओडिशाच्या बोलांगिर जिल्ह्यातील तितलागढ जंक्शन या स्टेशनवर पोहोचली. येथून पुढे बोलांगिरमार्गे पुरीला जाण्यासाठी गाडीला उत्तर दिशेला जावे लागते. त्यासाठी तितलागढ येथे गाडीचे इंजिन काढून दुसºया दिशेने जोडले जाते आणि त्यानंतर, गाडीचा प्रवास आधीच्या उलट्या दिशेने
सुरू होतो. गाडीचे इंजिन दुसºया बाजूने जोडण्यासाठी काढले, परंतु इंजिन वळवून दुसºया दिशेने जोडण्यासाठी आणेपर्यंत इंजिनाविना उभे केलेले २२ डबे ज्या दिशेने गाडी आली होती, त्या दिशेला उतारावरून घरंगळत निघाले.
ते अर्धा तास घरंघळत २० किमी गेले.
अखेर त्या मार्गावरील केसिंगा स्टेशनजवळ रेल्वे कर्मचाºयांनी रुळांवर मोठे दगड टाकून ही अनियंत्रित गाडी मोठ्या मुश्किलीने थांबविली. गाडी इंजिनविना धावत असताना वाटेतील सर्व रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात
आले होते.