Narendra Modi: गरिबांपर्यंत त्यांचा हक्क पोहोचवल्याशिवाय, मी शांत बसणार नाही; पंतप्रधान मोदींचं जनतेला आश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 10:52 PM2022-03-10T22:52:28+5:302022-03-10T22:53:51+5:30
मोदी म्हणाले, देशातील गरिबांच्या नावावर अनेक योजना आणल्या गेल्या, घोषणाही अनेक झाल्या. मात्र, ज्यावर त्यांचा हक्क होता, त्यांना तो हक्क मिळाला नाही.
नवी दिल्ली - आज देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यांपैकी पंजाब वगळता चार राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे या चारही राज्यांत जनतेने भाजपला पुन्हा संधी दिली आहे. भाजपच्या या बंपर विजयानंतर, आज भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी "मी गरिबांपर्यंत त्यांचा हक्क पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही," असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिले. चार राज्यांतील विजयानंतर मोदी कार्यकर्त्यांना आणि देशातील जनतेला संबोधित करत होते.
मोदी म्हणाले, देशातील गरिबांच्या नावावर अनेक योजना आणल्या गेल्या, घोषणाही अनेक झाल्या. मात्र, ज्यावर त्यांचा हक्क होता, त्यांना तो हक्क मिळाला नाही. मात्र, भाजपने गरिबांना त्यांचे हक्क मिळेल, हे निश्चित केले आहे. भाजप गरिबांना विश्वास देते की, प्रत्येक गरीब व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना निश्चितपणे पोहोचतील. एवढेच नाही, तर गरिबांना त्यांचा हक्क, त्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही विजयी झालो, तेव्हा काही राजकीय पंडितांनी म्हटले होते की, या 2019 च्या भाजपाच्या विजयात विशेष काय आहे? भाजपाचा विजय 2017 मध्येच निश्चित झाला होता. आता यावेळीही हे पंडित नक्कीच म्हणण्याची हिंमत करतील की, 2022 च्या उत्तर प्रदेशातील निकालांनी 2024 चे निकाल निश्चित केले आहेत, असे मी मानतो, असेही मोदी म्हणाले.
महिलांचे आभार मानतो - मोदी
आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर मला विशेषत: देशातील महिलांचे, माता भगिनींचे आभार मानायचे आहेत. कारण, या माता-भगिनींनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान केले. सरकारने नेहमीच महिलांच्या समस्या जाणून त्यांना प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच, महिलांनी भाजपला भरभरून मतदान दिले. 'जिथे महिलांनी जास्त मतदान केले, तिथे भाजपला बंपर विजय मिळाला', असेही मोदी यावेळी म्हटले.