भाजपाला विश्वासात न घेता सेना उमदेवारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:50 AM2018-04-27T00:50:03+5:302018-04-27T00:50:03+5:30
नाशिकमध्ये शिवसेनेकडे १८८, भाजपाकडे १५५ अशी तब्बल ३४३ मते आहेत तर राष्ट्रवादी ८९ आणि काँग्रेस ७३ मिळून आघाडीचे संख्याबळ १६२ इतकेच आहे.
विशेष प्रतिनिधी ।
मुंंबई : राज्यात सत्तारुढ भाजपा-शिवसेनेतील दरी दिवसेंदिवस वाढत असून भाजपाला विश्वासात न घेता नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. या आधी मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून भाजपाने परस्पर उमेदवार जाहीर केले होते. शिवसेनेने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा वर्षांपूर्वीची विधान परिषद निवडणूक शिवसेनेने लढविली होती आणि भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. यावेळी भाजपाशी पाठिंब्याची कोणतीही बोलणी न करता शिवसेनेने उमेदवार निश्चित केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मातोश्रीवर बैठक झाली. तीत नाशिकमध्ये दराडे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावा, असे आदेश ठाकरे यांनी दिले.
नाशिकमध्ये शिवसेनेकडे १८८, भाजपाकडे १५५ अशी तब्बल ३४३ मते आहेत तर राष्ट्रवादी ८९ आणि काँग्रेस ७३ मिळून आघाडीचे संख्याबळ १६२ इतकेच आहे. शिवसेना व भाजपा वेगळे लढले आणि त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आले तर भाजपा वा शिवसेनेला विजय मिळविणे कठीण जाईल. राष्ट्रवादीचे जयंत जाधव हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. भाजपाने विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदारसंघात अनिलकुमार राजेसिंग देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनिकेत विजय पाटील यांना दोन दिवसांपूर्वी उमेदवारी दिली आहे. अनिकेत हे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र आहेत. या दोघांना उमेदवारी देताना भाजपाने आम्हाला कुठे विश्वासात घेतले, असा सवाल शिवसेनेच्या एका नेत्याने केला.
कर्नाटकात ६० जागा लढणार
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेना ६० जागा लढत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना शिवसेनेचा पाठिंबा असेल.