धोनीची वैयक्तिक माहिती जाहीर केल्याने साक्षी संतापली
By Admin | Published: March 29, 2017 09:29 AM2017-03-29T09:29:58+5:302017-03-29T09:30:27+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची वैयक्तिक माहिती लीक झाल्याने पत्नी साक्षीने संताप व्यक्त केला आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची वैयक्तिक माहिती लीक झाल्याने पत्नी साक्षीने संताप व्यक्त केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. आधार कार्डच्या प्रमोशनादरम्यान अपघाताने एजन्सीकडून धोनीची वैयक्तिक माहिती जाहीर करण्यात आल्याने साक्षीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला धारेवर धरत संताप व्यक्त केला. यानंतर साक्षीने सरळ माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांना ट्विट करत प्रश्न विचारले.
महेंद्रसिंग धोनीच्या घरी जाऊन अधिका-यांनी आधार कार्डची प्रक्रिया पुर्ण केली होती. यावेळी धोनीसोबत फोटो काढण्यात आला होता, जो एनज्सीने ट्विट केला होता. या ट्विटमध्ये रवीशंकर प्रसाद यांनाही टॅग करण्यात आलं होतं. या ट्विटमध्ये धोनीच्या फोटोसोबत त्याची वैयक्तिक माहिती देणा-या फॉर्मची कॉपीही टाकण्यात आली होती. यानंतर साक्षीने संताप व्यक्त करत ट्विटरच्या माध्यमातून प्रायव्हसी नावाचा काही प्रकार आहे का ?, असा सवाल रवीशंकर प्रसाद यांना केला.
VLE of @CSCegov_ delivers #Aadhaar service to @msdhoni. Legendary cricketer's #Digital hook (shot). pic.twitter.com/Xe62Ta63An
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) March 28, 2017
साक्षीच्या ट्विटला रवीशंकर प्रसाद यांनीही तातडीने उत्तर दिलं. मात्र रवीशंकर प्रसाद यांना सुरुवातील काय झालं होतं कळलं नाही. त्यांनी साक्षीला काही ट्विटमधून काही वैयक्तिक माहिती लीक झाली का ? अशी विचारणा केली. यानंतर साक्षीने उत्तर देत आधार कार्ड फॉर्ममध्ये वैयक्तीक माहिती भरलेली आहे. तो फॉर्म अपलोड करण्यात आलाय, असं ट्विट करुन उत्तर दिलं.
यानंतर रवीशंकर प्रसाद यांनी याची तातडीने दखल घेत ट्वीट हटवण्यास सांगितलं. शिवाय हा प्रकार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही दिलं.