जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला अमानुष मारहाण, नग्न करून काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:12 PM2019-02-05T16:12:17+5:302019-02-05T16:13:23+5:30
झारखंडमध्ये एका 50 वर्षीय महिलेला जादूटोण्याच्या नावाखाली मारहाण करण्यात आली आहे.
रांची- झारखंडमध्ये एका 50 वर्षीय महिलेला जादूटोण्याच्या नावाखाली मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीवरच न थांबता त्या महिलेला नग्न करून तिची गावातून धिंड काढण्यात आली. दुमका जिल्ह्यातील मुख्यालयापासून जवळपास 57 किलोमीटरवरच्या तलझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. महेश लिट्टी गावातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूपश्चात मृतांच्या कुटुंबीयांनी मृतकाच्या भावाची पत्नी, सून आणि मुलीवर चेटकिणीचा आरोप लावत त्यांना मारहाण केली आणि तिघींना बंदी बनवलं. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी अथक प्रयत्नांनी त्या तिघींना जमावाच्या तावडीतून सोडवलं. तिघींनाही उपचारासाठी आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणात पोलिसांनी सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणारे स्थानिक डीएसपी संतोष कुमार म्हणाले, महेश लिट्टी गावात वास्तव्याला असणाऱ्या 50 वर्षीय सोनालाल किस्कू रविवारी सकाळी राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. रॅलीहून परतणाऱ्या काही लोकांना ते बसच्या सीटवर मृतावस्थेत सापडले. सोनालालचा मुलगा किस्कू व त्याच्या इतर नातेवाईकांनी त्यांचा जादूटोण्यानं मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढत गाववाल्यांना भडकावले. सोनालालच्या मृत्यूचा आरोप त्याच्या मोठ्या भावाच्या 50 वर्षाच्या पत्नीवर लावण्यात आला.
सोनालालचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी सांगितलं की, सोनालालच्या भावाची बायको एक चेटकीण असून, ती जादूटोणा करते. त्यानंतर सर्व ग्रामस्थ सोनालालच्या भावाच्या घरी पोहोचले, सोनालालच्या चुलत भावाची बायको, सून आणि मुलीला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. तसेच सोनालालच्या भावाच्या पत्नाला निर्वस्त्र करून तिची गावातून धिंड काढली. आरोपींचं अजूनही मन न भरल्यानं त्यांनी तिघींनाही एका खोलीत बंद करून रूमला टाळं लावलं. त्यानंतर पोलिसांना ही घटना समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिघींनाही जमावाच्या तावडीतून सोडवलं. कलम 2001अंतर्गत सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस लवकरच आरोपींना अटक करतील.