'राम रहीमविरोधात साक्ष देण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर केला हल्ला; अपहरणाचाही प्रयत्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 09:07 AM2017-11-18T09:07:10+5:302017-11-18T09:10:43+5:30
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा माजी ड्रायव्हर खट्टा सिंह आपल्यावर राम रहीमविरोधात खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. आपल्या अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे
चंदिगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा माजी ड्रायव्हर खट्टा सिंह आपल्यावर राम रहीमविरोधात खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. आपल्या अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे. हा आरोप अशावेळी करण्यात आला आहे जेव्हा, खट्टा सिंहने पत्रकार रामचंद्र छत्रपती आणि डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंहच्या हत्येसाठी गुरमीत राम रहीमला जबाबदार धरत याचिका दाखल केली आहे.
खट्टा सिंहची भाची असल्याचा दावा करणा-या सुमिंदर कौरने आरोप केला आहे की, राम रहीमविरोधात खोटी साक्ष देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात आहे. 'खट्ट सिंह डे-याची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मलादेखील सामील करुन घेण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी नकार दिला तेव्हा मला धमकावण्यात आलं, माझ्यावर हल्ला झाला. त्यांनी माझ्या अपहरणाचाही प्रयत्न केला', असा आरोप सुमिंदर कौरने केला आहे.
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.
बाबा राम रहीमने 2002 साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिका-यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिका-यांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. न्या. जगदीप सिंह यांनीही अत्यंत निडरपणे निकाल दिला.
राम रहीमला बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर हनीप्रीत फरार झाली होती. यानंतर पोलिसांनी शोध घेत तब्बल 38 दिवसांनी हनीप्रीतला अटक केली. पोलीस यादरम्यान नेपाळ, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात हनीप्रीतचा शोध घेतला होता. यानंतर पंजाबमधून हनीप्रीतला अटक करत बेड्या ठोकण्यात आल्या.