महिलेवरील हल्ला; केंद्राकडून गंभीर दखल
By admin | Published: February 5, 2016 03:09 AM2016-02-05T03:09:08+5:302016-02-05T03:09:08+5:30
टांझानियाच्या महिलेवरील हल्ला आणि तिला निर्वस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला याबाबतचा विस्तृत अहवाल आणि
नवी दिल्ली / बंगळुरू : टांझानियाच्या महिलेवरील हल्ला आणि तिला निर्वस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला याबाबतचा विस्तृत अहवाल आणि दोषींविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करून कर्नाटक सरकारला तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.
टांझानियाच्या महिलेवर हल्ला करण्याला कारणीभूत ठरलेली परिस्थिती, या हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांविरुद्ध करण्यात आलेली कारवाई आणि पीडित महिलेच्या संरक्षणासाठी केलेली उपाययोजना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने कर्नाटक सरकारला दिले.
बंगळुरू येथे रविवारी रात्री एका कारने महिलेला चिरडून ठार केल्यानंतर संतप्त जमावाने टांझानियाच्या २१ वर्षीय महिलेला कारमधून बाहेर खेचून जबर मारहाण केली आणि तिचे कपडेही फाडले. महिलेला चिरडणाऱ्या कारचा चालक कारसह पसार झाल्यानंतर काही वेळाने ही टांझानियाची महिला आपल्या कारने अपघातस्थळी आली. जमावाने तिला महिलेला चिरडणाऱ्या चालकाचीच मैत्रीण समजून कारमधून बाहेर ओढले आणि मारहाण केली.
भाजपने मात्र राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना या घटनेबाबत ते गप्प का आहेत, असा सवाल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला.