दारू दुकानासाठी महिलेने लावली ५१० कोटींची बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:17 AM2021-03-09T02:17:26+5:302021-03-09T02:17:37+5:30
राजस्थानात लिलाव, किमान किंमत होती ७२ लाख
जयपूर : राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यातील एका दारूच्या दुकानासाठी एका महिलेने तब्बल ५१० कोटी रुपयांची बोली लावल्याने सरकारी अधिकारीही थक्क झाले आहेत. या दुकानासाठी सरकारने ठरविलेली मूळ किमान किंमत केवळ ७२ लाख रुपये होती, हे विशेष.
राज्यात सध्या दारूच्या दुकानांचा ई-लिलाव सुरू झाला आहे. त्यात हनुमानगडमधील नोहार गावातील एका दुकानाचाही समावेश होता. त्यात किरण कंवर या महिलेने ५१० कोटी १० लाख १५ हजार ४०० रुपयांची बोली लावली. ही सर्वात मोठी बोली होती. या महिलेला तीन दिवसांच्या आत ही रक्कम भरण्यास सांगण्यात आले आहे. ते न केल्यास तिने ई-लिलावात सहभागी होण्यासाठी भरलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याखालोखाल बोली लावणारी एक महिलाच होती. प्रियंका कंवरने लावलेली बोलीही कोटींमधील आहे. किरण व प्रियंका यांच्यात कुटुंबांत कायम स्पर्धा सुरू असते. गावातील दुकान आपल्याला मिळावे, यासाठी लिलावातही त्यांची स्पर्धा पाहायला मिळाली. किरणची बोली सर्वात मोठी ठरली. तिने रक्कम न भरल्यास प्रियंकाला ते दुकान मिळू शकेल. अर्थात तिलाही तीन दिवसांत रक्कम भरावी लागेल.
सरकार मालामाल
n यावर्षी राज्यातील १६३० दुुकानांचा ई-लिलाव झाला. त्यात ३२६२ जण सहभागी झाले होते. मात्र, ४८१ दुकानांसाठी प्रत्येकी केवळ एकच बोली आल्याने ती मूळ किमतीत विकली जातील.
n याशिवाय ३९ दुकानांसाठी कोणी पुढेच आले नाही. लिलावातून १२७९ कोटी रुपये मिळतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात त्याहून अधिक रक्कम सरकारला मिळेल, असे दिसत आहे.