कौतुकास्पद! महिलेनं 10 लाख साठवून गावासाठी घेतली रुग्णवाहिका; मन हेलावून टाकणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:43 PM2022-04-18T19:43:34+5:302022-04-18T19:44:32+5:30
रुग्णवाहिकेअभावी गावात कोणालाही जीव गमवावा लागू नये म्हणून मोठं पाऊल उचललं आहे.
नवी दिल्ली - वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने एका महिलेने आपला पती गमावला होता. पण आता रुग्णवाहिकेअभावी गावात कोणालाही जीव गमवावा लागू नये म्हणून तिने मोठं पाऊल उचललं आहे. महिलेने गावाला रुग्णवाहिका दान केली आहे. तिने पेन्शन आणि इतर पैशांची बचत करून तब्बल दहा लाख रुपये जमा झाल्यावर रुग्णवाहिका खरेदी केली आहे. धर्मादेवी असं या महिलेचं नाव असून त्या राजस्थानच्या फतेहपूर शेखावटीमध्ये राहतात. या महिलेच्या दानशूरपणाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. नीमकाथाना येथील रहिवासी धर्मादेवी यांचे पती सेवानिवृत्त सुभेदार यांना चार वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून या महिलेने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आणि आता 10 लाख रुपयांची रुग्णवाहिका खरेदी करून ती गावातील रुग्णालयाला सुपूर्द केली. रुग्णवाहिका नसल्यामुळे कोणालाही जीव गमवावा लागू नये, हा त्यामागचा हेतू आहे. धर्मा देवी यांचा मुलगा आणि सरपंच शेर सिंह तन्वर यांनी सांगितलं की, त्यांचे वडील रावत सिंह तन्वर यांना चार वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. रात्र असल्यामुळे रुग्णवाहिका किंवा कार सापडली नाही.
रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यांच्या वडिलांना वाचवता आले नाही. आई धर्मादेवी आणि भावांनी तेव्हापासून गावासाठी रुग्णवाहिका खरेदी करणार असल्याचा संकल्प केला होता. त्यानुसार गेल्या चार वर्षांपासून ते पैसे गोळा करत होते. अखेर त्यांनी 10 लाख रुपयांची रुग्णवाहिका खरेदी केली आणि गावच्या रुग्णालयाकडे गावकऱ्यांच्या सोयीसाठी सुपूर्द केली. गावामध्ये मोठे रुग्णालय नसल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना नीमकाथाना किंवा जयपूरला न्यावं लागतं. डोंगराळ भाग असल्याने नीमकाथाना येथून रुग्णवाहिका येण्यास वेळ लागतो.
रुग्ण वेळेत पोहोचण्याची शक्यता कमी असते, परिणामी त्यांना जीव गमवावा लागतो. परंतु आता रुग्णवाहिका उपलब्ध असल्यामुळे गरजूंना रुग्णवाहिका सहज मिळू शकते. रुग्णवाहिका चालवण्याचा संपूर्ण खर्चदेखील धर्मादेवी देतील. डिझेल, चालकाचा पगार आणि रुग्णवाहिकेच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च सर्व त्याच देणार आहेत. रुग्णांकडून कोणतेही पैसे आकारले जाणार नाही. रुग्णवाहिका हवी असेल, तर त्यासाठी कॉल करण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांकदेखील जारी केला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.