अतिप्रसंग करणा-याला तिने जीभ तोडून घडवली अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 06:59 PM2017-08-02T18:59:55+5:302017-08-02T19:03:33+5:30
केरळमध्ये एका महिलेनं स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी तिच्यावर अतिप्रसंग करणा-याला चांगलीच अद्दल घडवली आहे.
तिरुवनंतपुरम, दि. 2 - केरळमध्ये एका महिलेनं स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी तिच्यावर अतिप्रसंग करणा-याला चांगलीच अद्दल घडवली आहे. कोचीमध्ये सोमवारी रात्री एका महिलेवर शेजारील व्यक्तीनं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं महिलेचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेनं स्वतःच्या बचावाखातर चक्क त्या व्यक्तीची जीभच तोडून टाकली. महिलेनं या प्रकाराची पोलिसांत तक्रार दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे तिने 30 वर्षीय शेजा-याची कापलेली 2 सेंटीमीटरची जीभही पोलिसांच्या हवाली केली.
पोलिसांनी त्या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 447, 354, 367 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीसुद्धा त्याला लैंगिक छळाच्या आरोपाखाली एक आठवड्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी केरळमध्ये काँग्रेस आमदाराने एका 51 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकारानंतर या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आमदार एम विन्सेट याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. आमदाराविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, तिरुवअनंतपूरममधील बलरामपूरम येथे राहणाऱ्या 51 वर्षीय गृहिणीने बुधवारी ( 19 रोजी ) झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात येताच महिलेच्या पतीने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी पोलिसांना दिलेल्या जबाबात आमदार एम विन्सेटने आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले होते. गेले काही दिवस विन्सेट आपला पाठलाग करत होता. त्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ चालवला होता. तसेच त्याने दोन वेळा सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले होते, हे सर्व आरोप आमदाराने फेटाळले आहेत.