कडक सॅल्यूट! रणरणत्या उन्हात वृद्ध महिलेला घेतलं पाठीवर; जीव वाचवण्यासाठी पोलिसाची धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 02:13 PM2022-04-23T14:13:10+5:302022-04-23T14:15:31+5:30
महिलेल्या आपल्या पाठीवर घेतलं आणि वाळवंटात पायी तिला उपचारासाठी घेऊन निघाल्या.
नवी दिल्ली - गुजरातमध्ये एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. एका महिला पोलीस कान्स्टेबलने एका वृद्ध महिलेचा जीव वाचवला आहे. कच्छमधील खादिर रेगिस्तानातील भंजदा डोंगरावर एक वृद्ध महिला बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी नेता यावं म्हणून महिला पोलिसाने तिला आपल्या पाठीवर घेतलं. या कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकी जपणाऱ्या महिला पोलिसाचा फोटो आणि व्हि़डीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खादिरच्या धोलावीरापासून 10 किमी दूर असलेल्या भंजदा दादा मंदिरात मोरारी बापूंच्या रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं. नव्या भंजदा दादा मंदिरापासून 5 किमी दूर एका उंच डोंगरावर जुनं भंजदा दादा मंदिर आहे. त्यामुळे मोरारी बापूंची रामकथा ऐकण्यासाठी आलेले भाविक या मंदिरातही जात होते. एका 86 वर्षांच्या महिलेलाही त्या मंदिरात दर्शन करण्याची इच्छा होती. त्यामुळे तीसुद्धा तिथं गेली.
डोंगरावर चढताना अर्ध्या रस्त्यातच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. रामकथेचं आयोजन केल्यानं परिसरात पोलीसही तैनात होते. रापर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक वर्षाबेन माजीवाभाई परमार यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्या तात्काळ महिलेपर्यंत पोहोचल्या. त्यांनी लगेच या महिलेल्या आपल्या पाठीवर घेतलं आणि वाळवंटात पायी तिला उपचारासाठी घेऊन निघाल्या.
तब्बल पाच किलोमीटर त्या चालल्या. महिलेवर त्यांनी उपचार करवून घेतलं आणि उपचार झाल्यानंतर त्यांनी तिला पुन्हा भंजद दादा मंदिरात सोडलं. पूर्व कच्छचे पोलीस प्रमुख महेंद्र बगडिया यांनी महिला पोलिसाचं कौतकुक केलं आहे. रापर पोलीस निरीक्षक एम.एन राणा यांनी पोलीस सेवेसाठी सैदव तत्पर असल्याचं म्हटलं आहे. सध्या सर्वत्र य़ा महिला पोलीस कर्मचाऱ्याचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.