काश्मीरमध्ये इमारतीत लपलेत दहशतवादी, क्रॉस फायरिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू
By admin | Published: July 1, 2017 10:32 AM2017-07-01T10:32:42+5:302017-07-01T15:21:47+5:30
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये पहाटेपासून चकमक सुरु आहे
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये पहाटेपासून चकमक सुरु आहे. दहशतवादी परिसरातील एका घरात लपून बसले आहेत. दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये गोळीबार सुरु आहे. या गोळीबारात एका सामान्य महिलेचा मृत्यू झाला आहे.
"बाटपोरा गावात दहशतवादी एका घरात लपले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा जवानांनी ऑपरेशन लाँच केल. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. क्रॉस फायरिंग सुरु असताना एका महिलेला गोळी लागून ती जखमी झाली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
"ताहिरा असं या 44 वर्षीय महिलेचं नाव आहे. चकमकीदरम्यान जखमी झाल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिला वाचवू शकलो नाही", अशी माहिती अधिका-यांनी दिली आहे.
J&K:Search operations by security forces in Dailgam village in Anantnag district. Two militants believed to be hiding (deferred visuals) pic.twitter.com/TnPFHPMMtf
— ANI (@ANI_news) July 1, 2017
याआधी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी संपुर्ण परिसरात गराडा घातला होता, आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी बशीर लष्करीचंही नाव आहे. काश्मीरमधील पोलीस अधिकारी फिरोज अहमद दार आणि इतर पाच पोलीस कर्मचा-यांच्या हत्येमध्ये त्याचा हात असल्याची शक्यता आहे.
सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. दहशतवादी सामान्यांचा ढाल म्हणून वापरत आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासोबतच ओलीस ठेवलेल्या सामान्यांना सुखरुप बाहेर काढणं आमचं मुख्य लक्ष्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.