पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद, निवृत्त महिला पोलीस निरीक्षकाकडून 1.10 कोटी रुपयांचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 09:39 AM2020-06-14T09:39:54+5:302020-06-14T09:43:41+5:30
पुष्पा दुबे यांनी पीएम केअर्स फंडात एक कोटी आणि उत्तर प्रदेश सीएम रिलीफ फंडात दहा लाख रुपयांची मदत केली आहे.
लखनऊ : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या तीन लाखाहून अधिक झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने एकत्र काम करत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी लोकांना पीएम केअर्स फंडात मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ७० वर्षीय निवृत्त महिला पोलीस निरीक्षक पुष्पा दुबे यांनी आपली सर्व कमाई पीएम केअर्स फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.
पुष्पा दुबे यांनी पीएम केअर्स फंडात एक कोटी आणि उत्तर प्रदेश सीएम रिलीफ फंडात दहा लाख रुपयांची मदत केली आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश पोलीस सेवेतून निरीक्षक म्हणून निवृत्त झालेल्या पुष्पा दुबे यांनी आपल्या एलआयसीची पॉलिसी आणि मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) फोडून ही रक्कम जमा केली आहे. शनिवारी पुष्पा दुबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि हा निधी त्यांच्याकडे सोपविला.
जागतिक माहामारीचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे मदत करण्यासाठी प्रेरित झाले, असे लखनऊमधील इंदिरा नगर येथे राहणाऱ्या पुष्पा दुबे यांनी सांगितले. त्यांची शेवटची पोस्टिंग सचिवालय व सीआयडी मुख्यालयात झाली होती. तसेच, त्यांनी कुटुंबीयांविषयी फारशी माहिती न देता आपल्या घरात राहत असून सध्या मिळणारे पेन्शन हे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे असल्याचे त्यांनी सांगितले. इटावा आणि पीलीभीत याठिकाणी पुष्पा दुबे यांनी आपले एमएससीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस सेवेत नोकरी करण्याचे ठरविले होते.
पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार...
पीएम केअर्स फंडाबाबत वाद वाढत आहे. त्यामुळे पीएम केअर्स फंडाचे ऑडिट केले जाणार आहे. वाद आणि कोर्टाच्या खटल्यांना सामोरे जात मोदी सरकारने शुक्रवारी पीएम केअर्स फंडाचे ऑडिट माहिती अपडेट करण्यासाठी स्वतंत्र ऑडिटरची (लेखापरीक्षक) नियुक्ती केली आहे. तसेच, पंतप्रधान कार्यालयाचे दोन अधिकारी मानद आधारावर या फंडाचे काम पाहणार आहेत.