अरे देवा! 13 तास ऑटोमध्ये फिरली; पैसे मागताच ड्रायव्हरवर चिडली; रस्त्यातच घातला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 10:05 AM2023-07-25T10:05:08+5:302023-07-25T10:09:08+5:30
ज्योती नावाच्या महिलेने रात्री दहाच्या सुमारास मेदांता हॉस्पिटलजवळ ऑटो बुक केली. सकाळी अकरा वाजेपर्यंत फिरत राहिली.
दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामच्या सायबर सिटीमध्ये एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्योती नावाच्या महिलेने रात्री दहाच्या सुमारास मेदांता हॉस्पिटलजवळ ऑटो बुक केली. सकाळी अकरा वाजेपर्यंत फिरत राहिली. ऑटोचालकाने महिलेला कुठे जायचे आहे ते नक्की सांग किंवा पैसे देऊन ऑटो रिकामी कर असं सांगितलं.
ऑटोचालक दीपकने बिल मागितल्याने महिला संतप्त झाली आणि त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊ लागली. यानंतर दीपकने गुरुग्राम पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशी ज्योतीचा वाद होऊ लागला. ऑटोचालक दीपकच्या म्हणण्यानुसार, रात्री 10 वाजता एका एपद्वारे ऑटो बुक करण्यात आली आणि 11 वाजेपर्यंत ऑटो इकडे-तिकडे फिरत राहिली.
जेव्हा बिल दोन हजार झाले तेव्हा महिला म्हणू लागली की मी पेटीएम करते. मात्र त्यानंतर दोन तास उलटून गेले. पुन्हा पैसे मागितल्यावर महिलेने ऑटोमधून खाली उतरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि लोक जमले. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि महिलेला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. त्याचवेळी आणखी एका महिलेने या घटनेचा व्हिडीओ बनवून तो ट्विटरवर व्हायरल केला.
या प्रकरणी सेक्टर 29 पोलीस ठाण्याने सांगितले की, महिलेविरुद्ध कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यावर कारवाई केली जाईल. सध्या ऑटोचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही सायबर सिटीमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.