बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 05:04 PM2024-09-21T17:04:54+5:302024-09-21T17:16:56+5:30
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर महिलेने त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने नवरा आणि घरदार सोडलं.
बिकानेरच्या जसरासर गावातील विवाहित महिला सोशल मीडियावर एका तरुणाच्या प्रेमात पडली. हा तरुण पंक्चरवाला आहे. या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने नवरा आणि घरदार सोडलं. ती आता तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. मात्र यामुळे नवऱ्याचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत.
निर्मला असं या महिलेचं नाव असून तिने सांगितलं की, तिचं मूळ गाव बीकानेर जिल्ह्यातील लूणकरणसर येथे असलेलं हंसेरा गाव आहे. २०१५ मध्ये तिचं लग्न झालं. दारू पिऊन पती मारतो असा आरोप महिलेने केला आहे. तसेच घरगुती कारणावरून तो तिचा मानसिक छळ करतो.
सुमारे दोन वर्षांपूर्वी तिचे राजलदेसर येथील सुनील आचार्य याच्याशी ओळख झाली. सुनीलचं रतनगड येथे टायर पंक्चरचं दुकान आहे. इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. त्यानंतर ते मोबाईलवर बोलू लागले. निर्मलाने सांगितलं की, तिच्या कुटुंबीयांना सुनीलबद्दल कळलं होतं. त्यामुळेच तिला मारहाण करण्यात आली. नंतर मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली.
९ सप्टेंबर रोजी आपल्या ४ वर्षांच्या मुलीसह सासरचे घर सोडून ती सुनीलसोबत कोटपुतळी येथे गेली. तेथे ३ दिवस राहिल्यानंतर दोघेही बसने दिल्लीला गेले. मग तिथून चुरूला पोहोचले. निर्मलाने सांगितलं की, ती घरातून बाहेर पडल्यानंतर सासरच्यांनी पोलीस ठाण्यात तिच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. घरातून ६० हजार रुपये आणि ५ लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन गेल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळींनी केला आहे.
निर्मला म्हणते की, तिने कोणतेही दागिने आणलेले नाहीत. तिचे सासरचे लोक तिच्यावर खोटे आरोप करत आहेत. सुनीलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये स्वतःच्या इच्छेने राहत आहे. तिच्या आणि सुनीलच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सुरक्षेची मागणी करत ती चुरूच्या एसपी कार्यालयात आली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.