पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात गेलेली; पीएसआयच्या पिस्तुलमधून गोळी सुटली, डोक्याला लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 05:41 PM2023-12-08T17:41:45+5:302023-12-08T17:42:00+5:30
महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. तर या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसावर कारवाई केली असून त्याला तत्काळ निलंबित केले आहे.
उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये धक्कादायक दुर्घटना घडली आहे. पासपोर्टच्या कामासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्याला पीएसआयच्या पिस्तुलची गोळी लागली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. एक महिला थेट खाली कोसळल्याचे पाहून सर्व घाबरले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
महिलेला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. तर या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसावर कारवाई केली असून त्याला तत्काळ निलंबित केले आहे.
अलिगढच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. एक महिला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आली होती. ती पोलीसाच्या टेबलसमोर उभी होती. तेव्हा हा पोलीस त्याची पिस्तुल साफ करत होता. अचानक त्याच्या हातातील पिस्तुलमधून गोळी सुटली आणि थेट त्या महिलेच्या डोक्याला लागली. हे पाहून शेजारच्या व्यक्तीने पडलेल्या महिलेला धावत जात उठविण्याचा प्रयत्न केला, परंतू ती बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला लगेचच जेएन मेडिकल कॉलेजमध्ये भरती केले आहे.
या प्रकरणी पोलीस अधिकारी मनोज शर्माला निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीमध्ये एक पोलीस शिपाई पीएसआयला त्याची पिस्तुल आणून देतो. तो ती पिस्तुल घेत इकडे तिकडे रोखून धरतो. याचवेळी अचानक गोळी सुटते आणि बुरखाधारी महिलेला लागते. हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यामध्ये पीएसआयची चुकी असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.