या महिलेने शोधला होता वीरप्पनचा ठावठिकाणा, मोहीम फत्ते झाल्यावर गेली विस्मरणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:35 PM2018-10-08T15:35:33+5:302018-10-08T15:36:01+5:30
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याने 90 च्या दशकामध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घातला होता. वनखाते, पोलीस आणि सुरक्षा दलांनी जंगजंग पछाडूनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेरीस 2004 साली ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी एका चकमकीत वीरप्पनचा खात्मा केला होता.
कोईंबतूर - कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याने 90 च्या दशकामध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घातला होता. वनखाते, पोलीस आणि सुरक्षा दलांनी जंगजंग पछाडूनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेरीस 2004 साली ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी एका चकमकीत वीरप्पनचा खात्मा केला होता. मात्र तीन राज्यांमधील पोलिसांना अनेक वर्षे चकमा देणाऱ्या वीरप्पनचा शोध घेण्यात शानमुगा प्रिया या महिलेने आपल्या जिवाची बाजी लावून मदत केली होती. मात्र वीरप्पनचा खात्मा झाल्यानंतर पोलिसांचा गौरव झाला, पण या महिलेला मात्र सगळेच विसरून गेले.
वडावली येथे राहणारी शानमुगा प्रिया ही महिला आपल्या घाडसाची कहाणी आपल्या दहा वर्षांच्या मुलीला रोज सांगत असते. "जेव्हा वीरप्पनच्या आसपास जाण्यासही सर्वजण घाबरत तेव्हा मी त्याच्या पत्नीसोबत मैत्री केली आणि वीरप्पनची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वीरप्पनला घेरून त्याला ठार मारले." असे प्रिया सांगते.
ऑपरेशन नॉर्दन स्टार अंतर्गत प्रिया वीरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मीसह त्याच्या घरात चार महिने राहिली होती. तेथून ती सगळी माहिती पोलिसांना पुरवत होती. त्यावेळी सगळे ठरल्या प्रमाणे झाले नाही. मात्र वीरप्पनची धुसर होत असलेली नजर आणि त्याचा जंगलातील ठावठिकाणा यांची माहिती पोलिसांना दिली, असे प्रिया सांगते. या कामगिरीसाठी बक्षीस देण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आले होते. मात्र बक्षीस दूरच आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असेही ति सांगते.
यासंदर्भात प्रिया हिने सरकार दरबारीसुद्धा पाठपुरावा केला. मात्र तिला अद्याप यश आलेले नाही. दुसरीकडे केवळ वीरप्पन विरोधातील शेवटच्या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचाच सन्मान करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.