माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, सासू अन् मुलीसमोर नदीत उडी घेतली; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:31 AM2021-05-26T09:31:22+5:302021-05-26T09:31:42+5:30
नर्मदेच्या पुलावरून महिलेची नदी पात्रात उडी; सासू, नवरा, मुलीला काही कळण्याच्या आत घडला प्रकार
भोपाळ: मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये असलेल्या नर्मदा नदी पुलावरून एका विवाहित महिलेनं उडी घेतली. पती, सासू आणि दोन वर्षांच्या मुलीसमोरच हा धक्कादायक प्रकार घडला. मात्र सगळं काही अतिशय वेगानं घडल्यानं महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना काहीच करता आलं नाही. नदीत उडी घेतलेली महिला माहेरी जात होती. त्यावेळी तिचा पतीसोबत वाद झाला. त्यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नर्मदा नदी पुलावरून पाण्यात उडी घेतलेली महिला खरनोल जिल्हाच्या ठिबगावची रहिवासी आहे. ही महिला मंगळवारी तिचा पती, सासू आणि दोन वर्षीय मुलीसोबत तिच्या माहेरी मंडलेश्वरला जात होती. त्यावेळी तिचा नवऱ्यासोबत काही कारणावरून वाद झाला. बाईक माकडखेडा येथील नर्मदा पुलावर येताच महिलेनं नवऱ्याला थांबयाला सांगितलं. नवऱ्यानं बाईक थांबवताच महिला खाली उतरली आणि कोणाला काही कळायच्या आत तिनं पाण्यात उडी मारली. त्यानंतर पतीनं मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.
भयावह! ५ महिने, ६ शस्त्रक्रिया, ३९ इंजेक्शन्स; उपचारांसाठी घरही विकलं; तरीही ब्लॅक फंगस पाठ सोडेना
महिलेला पुलावरून उडी मारताना राधेश्याम नावाच्या एका तरुणानं पाहिलं. राधेश्याम नर्मदा तटावर अंत्यसंस्कारासाठी आला होता. राधेश्यामनं मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी घेतली. त्यानं महिलेला बुडताना वाचवलं आणि तिला किनाऱ्यावर घेऊन आला. थोड्या वेळानं महिला शुद्धीवर आली. विशेष म्हणजे राधेश्यामला व्यवस्थित पोहता येत नाही. मात्र तरीही तो महिलेला वाचवण्यासाठी नदीत झेपावला. राधेश्यामनं दाखवलेल्या धाडसामुळे महिलेला जीवदान मिळालं.