केंद्रीय मंत्र्यांनी विचारले, "तुमचे श्रम कार्ड मोफत बनवले आहे का?" महिला म्हणाली, "नाही, ते 100 रुपये देऊन बनविले आहे"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 02:10 PM2021-11-01T14:10:17+5:302021-11-01T14:10:45+5:30
E-shram card : पाटणा येथे आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी आणि वितरण समारंभाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली शनिवारी आले होते.
पाटणा : केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्यासमोर शनिवारी बिहारमधील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला. ज्यावेळी एका महिलेने रामेश्वर तेली यांना ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी 100 रुपये मोजावे लागतात असे सांगितले. दरम्यान, दशरथ मांझी इन्स्टिट्यूट ऑफ लेबर अँड प्लॅनिंग स्टडीज, पाटणा येथे आयोजित ई-श्रम कार्ड नोंदणी आणि वितरण समारंभाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली शनिवारी आले होते. येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते काही लोकांना श्रम कार्डचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यासोबत बिहार सरकारचे कामगार मंत्री जीवेश मिश्रा देखील उपस्थित होते. (Woman labourer claims she paid money for e-shram card which Centre is distributing for free)
दरम्यान, पटनामधील मोहम्मदपूर येथील रहिवासी असलेल्या किरण देवी यांना त्यांचे श्रम कार्ड देण्यासाठी मंचावर बोलावण्यात आले. यावेळी श्रम कार्ड देताना रामेश्वर तेली यांनी किरणदेवी यांना प्रश्न विचारला की, श्रम कार्ड मोफत मिळाले आहे ना? यावर प्रत्युत्तर देताना किरण देवी यांनी मंचावरच हे श्रम कार्ड बनवून घेण्यासाठी 100 रुपये द्यावे लागले, असे सांगितले. मग काय, श्रम कार्ड बनवण्यासाठी महिलेला 100 रुपये द्यावे लागत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर आल्याने त्यांना धक्काच बसला नाही तर त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
रामेश्वर तेली यांनी किरण देवी यांना विचारले की, "पैसे दिले होते... तुम्ही कोणाला पैसे दिले?" यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेले बिहार सरकारचे कामगार मंत्री जीवेश कुमार यांच्याकडून तातडीने रिपोर्ट मागवला आणि ज्यांना श्रम कार्ड बनवण्यासाठी पैसे द्यावे लागले, त्यांना ती रक्कम त्वरित परत करावी, असे निर्देश दिले. कार्यक्रम संपल्यानंतर मीडियाने किरण देवी यांना विचारले की, श्रम कार्ड बनवण्यासाठी 100 रुपये कोणाला दिले? त्यावेळी कार्ड बनवणाऱ्याने त्यांच्याकडून घेतल्याचे किरण देवी यांनी सांगितले.
#WATCH | Bihar: "I paid money at a cyber cafe for E-Shram Card," labourer Kiran Devi told Union MoS for Labour & Employment Rameshwar Teli during an event where the minister was distributing the cards to beneficiaries
— ANI (@ANI) October 31, 2021
The labourer later said that she paid Rs 100 for the card. pic.twitter.com/ANVtY75P09
ई-श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदणी विनामूल्य
दरम्यान, ई-श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदणी विनामूल्य आहे, ज्यासाठी केंद्र सरकारने बजेटमध्ये 704 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. श्रम कार्ड बनवण्यासाठी केंद्र सरकार कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) 20 रुपये देते. मात्र, श्रम कार्ड बनवण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतात, असे किरण देवी यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितल्यावर बिहारमधील भ्रष्टाचार उघड झाला.