झारखंडमध्ये महिलेची हत्या; चोटी गँगमधील असल्याच्या संशयावरून केलं ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 09:14 AM2017-08-22T09:14:33+5:302017-08-22T09:26:28+5:30
गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत.
रांची, दि. 22- गेल्या काही दिवसांपाससून उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थान, मुंबई या भागांमध्ये महिलांची वेणी कापण्याचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. पण हा प्रकार नेमका कोण करतो हे अजूनही समोर आलेलं नाही. पण झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात वेणी कापणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयावरून एका महिलेला जमावाने ठेचून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. चोटी गँग असल्याचा संशय घेऊन शनिवारी तीन जणांवर हल्ला करण्यात आला होता, पण त्यांची सुटका करण्यात यश आलं होत, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
साहिबगंजमध्ये जमावाने चोटी गँगमधील असल्याच्या संशयावरून काही जणांना ताब्यात घेतलं होतं,त्यात एका महिलेचाही समावेश होता. या सर्वावर चोटी गँगच्या कृत्यात सामील असल्याचं समजून हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना त्यातील तीन जणांना वाचविण्यात यश आलं होतं. पण हल्ल्यात एक महिला जबर जखमी झाली होती. त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण त्यावेळी तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला, असं पोलिस अधीक्षक पी. मुरुगन यांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला होता पण तोपर्यंत या चौघांना गंभीरपणे मारहाण झालेली होती. साहिबगंज जिल्हय़ात वेणी कापण्याचा एकही प्रकार घडलेला नसताना हा हल्ला करण्यात आला. वेणी कापण्याच्या फक्त अफवा आहेत असंही, पोलिस अधीक्षक पी. मुरुगन म्हणाले आहेत. चोटी गँगमध्ये असल्याच्या संशयावरून महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणावर झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. दास यांनी लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन केलं आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मारल्या गेलेल्या महिलेच्या १४ वर्षीय मुलाची सरकार काळजी घेईल, असं दास यांनी सांगितलं. पूर्व सिंगभूम जिल्ह्यात वेणी कापण्याच्या घटना घडल्याच्या अफवा पसरल्याने पोलिसांनी सरपंच व लोक प्रतिनिधींची बैठक घेऊन या बाबत सविस्तर माहिती देत या घटना खोट्या असल्याचं सांगितलं आहे.