‘नो एन्ट्री’त घुसणाऱ्या मंत्र्याची गाडी महिला पोलिसाने रोखली
By admin | Published: May 20, 2015 02:33 AM2015-05-20T02:33:09+5:302015-05-20T02:33:09+5:30
चुकीच्या मार्गाने प्रवेश करू पाहणारे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांना परत पाठवत कर्तव्यदक्ष महिला अधिकारी काय करू शकतात याची चुणूक दाखविली.
पाटणा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) धाडसी महिला अधिकाऱ्याने मंगळवारी पाटणा विमानतळावर चुकीच्या मार्गाने प्रवेश करू पाहणारे केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांना परत पाठवत कर्तव्यदक्ष महिला अधिकारी काय करू शकतात याची चुणूक दाखविली. टीव्ही वाहिन्यांनी लगेच मंत्र्याला ‘नो एन्ट्री’चे वृत प्रसारित करीत या महिला अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
पाटण्याच्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये यादव बाहेर पडण्याच्या मार्गाने आत शिरले तेव्हा सदर महिला अधिकाऱ्याने त्यांना रोखले. त्यांच्यात कोणता संवाद झाला ते कळले नाही. नंतर ही महिला अधिकारी वॉकीटॉकीवर बोलत असल्याचे टीव्ही वाहिन्यांवर दाखविण्यात आले. या महिला अधिकाऱ्याने वॉकीटॉकीवर बोलणे संपताच मंत्र्याला थेट माघारी पाठविले. त्या महिला अधिकाऱ्याने वरिष्ठांशी त्याबाबत बोलणे झाल्याची माहिती दिली. यादव यांनीही फार वाद न घालता आदेश मानला. एवढेच नव्हे, तर चुकीची कबुली दिली. व्हीआयपींनी अशाप्रकारे प्रवेश करीत पदाचा गैरवापर करणे योग्य आहे काय? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता या मंत्र्याने होय, मी चूक केली असे म्हटले. (वृत्तसंस्था)
मी घाईघाईत प्रवेश करीत असताना चुकीने एक्झिट गेटमधून आत शिरलो. त्या महिला अधिकाऱ्याने मला रोखले आणि दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगितले. मी आदेश मानत दुसऱ्या दाराने प्रवेश केला. मी या महिला अधिकाऱ्याशी कोणताही वाद घातलेला नाही. कर्तव्यदक्षतेबद्दल मी त्यांच्या कामाची प्रशंसा केली, असेही यादव यांनी सांगितले. यादव हे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते.