ऑपरेशननंतर चालताही येत नव्हतं, मात्र तरीही हॉस्पिटलमधून अचानक बेपत्ता झाली महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:50 AM2023-11-09T11:50:36+5:302023-11-09T11:53:50+5:30
एक महिला प्रसूतीनंतर वॉर्डातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
बांदा येथील रानी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे. एक महिला प्रसूतीनंतर वॉर्डातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. घरच्यांना समजल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती दिली. शोधाशोध करण्यात आली, मात्र महिलेचा पत्ता लागला नाही. रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत कुटुंबीयांनी जिल्ह्याच्या डीएमकडे तक्रार केली असून न्याय मिळावा, अशी विनंती केली आहे.
डीएमने पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोणीही ऐकत नसल्याचे तक्रारदाराने डीएम कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी मदत करण्यास तयार नाहीत. मात्र, अद्याप या महिलेबाबत काहीही निष्पन्न झालेले नाही. एका मुलीला जन्म दिल्यानंतर ही महिला बेपत्ता झाली आहे. पोलीस आता सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत.
अनथुवा गावातील रहिवासी जगदीश प्रसाद यांनी सांगितलं की, धाकट्या भावाच्या पत्नीची डिलिव्हरी झाली. आठ नोव्हेंबरला सकाळी अचानक तिची प्रकृती खालावली. तिला हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र आता ती बेपत्ता आहे. सिझेरियन ऑपरेशन करून प्रसूती झाली, त्यामुळे तिला चालता येत नव्हतं. आता माझ्या पेशंटचा शोध घ्यावा अशी तक्रार करण्यासाठी मी डीएम सरांकडे आलो आहे.
आमचा रुग्ण शोधून आमच्या ताब्यात द्या, अशी विनंती तक्रारदार जगदीश प्रसाद यांनी केली आहे. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येऊन आमची मोठी चूक झाली. इथे चांगल्या सुविधा मिळतील असा विचार करून आलो होतो. छोट्या दवाखान्यात करून घेतली असती तर ऐकले असते. मी PRD सैनिक आहे. मी सर्वांची सेवा करतो. मात्र, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर आता पथके तपासात गुंतली आहेत. मात्र वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे साफ दुर्लक्ष समोर आले आहे असं म्हटलं.
एसपी कार्यालयाच्या मीडिया सेलने एक निवेदन जारी केले की 8 नोव्हेंबर रोजी महिला आपल्या नवजात मुलीला सोडून गेली आहे. ज्याची माहिती कोतवाली नगर पोलीस ठाण्यात मिळाली. सीसीटीव्ही तपासात महिला सकाळी मुख्य दरवाजातून बाहेर पडताना दिसत आहे. पोलीस आता या महिलेचा शोध घेत आहेत. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ सुनील कौशल यांनी सांगितले की, ती महिला तिच्या बेडवर झोपली होती आणि नंतर अचानक ती कुठेतरी गेली. त्याचा शोध घेतला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.