स्त्रीदेह सर्वस्वी तिचाच, परस्पर्श हा अत्याचार! गर्दीत लगट करणा-या तरुणास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:50 AM2018-01-22T03:50:07+5:302018-01-22T03:50:24+5:30
स्त्रीचा देह हा सर्वस्वी तिचाच असतो व त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो. त्यामुळे संमतीविना कोणीही तिला कोणत्याही प्रकारे स्पर्श करू शकत नाही
नवी दिल्ली : स्त्रीचा देह हा सर्वस्वी तिचाच असतो व त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो. त्यामुळे संमतीविना कोणीही तिला कोणत्याही प्रकारे स्पर्श करू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत, येथील न्यायालयाने एका ९ वर्षांच्या मुलीशी गर्दीचा गैरफायदा घेत, लगट करणा-या तरुणास ५ वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
स्त्री कितीही वयाची असली, तरी तिच्या देहाला तिच्या मनाविरुद्ध अन्य कोणी स्पर्श करणे हादेखील लैंगिक अत्याचार आहे, असा निष्कर्ष नोंदवत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश सीमा मैनी यांनी छवी राम या आरोपीला तुरुंगात धाडले. आरोपी छवीराम हा लैंगिक विकृती असलेला असल्याने तो दया दाखविण्यास पात्र नाही, असेही न्यायालयाने म्हटले व तुरुंगवासाखेरीज त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. यापैकी ५ हजार रुपये पीडित मुलीला द्यावेत. राज्य विधी सेवा प्राधिकरणाने पीडितेला भरपाई म्हणून ५० हजार रुपये द्यावे, असे निर्देशही न्यायाधीशांनी दिले.
शिक्षा झालेला छवी राम हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. २५ सप्टेंबर २०१४ रोजी ही पीडित मुलगी तिच्या आईसोबत दिल्लीच्या मुखर्जी नगरजवळील मार्केटमधून जात असताना छवीरामने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला होता. मुलीने हा प्रकार लगेच आईला सांगितल्यावर, आईने व इतर लोकांनी पळून जाणाºया छवीरामला पकडले होते.
हरियाणा सरकार १२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाºयांना फाशीची शिक्षा देण्यासाठी दंड संहितेत दुरुस्ती करणार आहे. यासाठीचे विधेयक लवकरच आणले जाईल.
विकृतांना मिळते ‘लैंगिक किक’
न्यायालयाने म्हटले
की, महिलांनाही खासगीपणाचा हक्क असतो हे विसरून जाऊन समाजात पुरुष आपली विकृत लैंगिक भूक भागविण्यासाठी स्त्रियांवर अनेक प्रकारे अत्याचार करताना दिसतात.
जणू या विकृतांना
अशा दुष्कृत्यांनी
‘लैंगिक किक’ चढते! गर्दीच्या मार्केटमध्ये,
बस व मेट्रोसारख्या सार्वजनिक
वाहनांमध्ये आणि चित्रपटगृहांसारख्या मनोरंजनाच्या ठिकाणी असे विकृत पुरुष वावरताना आढळतात.
भारतासारख्या
खुल्या, वेगाने प्रगती करीत असलेल्या व तांत्रिकदृष्ट्या महिलांना अशा विकृतांच्या चाळ्यांना बळी पडावे लागावे हे दुर्दैवी आहे.