अतिरेक्यांकडून महिलेची हत्या, काश्मीरमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात जवान जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:57 AM2017-10-23T04:57:05+5:302017-10-23T04:57:15+5:30
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी रविवारी महिलेला ठार मारले व दुसरीला गंभीर जखमी केले. हा हल्ला जैश-ए-महंमदने केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी रविवारी महिलेला ठार मारले व दुसरीला गंभीर जखमी केले. हा हल्ला जैश-ए-महंमदने केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मृत महिलेचे नाव यास्मिना (रा. खोनमोह) असून, रुबी (रा. सीर त्राल) जखमी झाली. नूर मोहम्मद तांत्रे उर्फ नूर त्राली हा या दोघींपैकी एकीशी संबंधित असून, श्रीनगर विमानतळानजीक असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात नूर हा मुख्य संशयित आहे.
^त्राल भागात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अश्रफ भट यांच्या निवासस्थानावर अतिरेक्यांनी रविवारी ग्रेनेडने हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान जखमी झाला. नॅशनल कॉन्फरन्सचे माजी आमदार मोहम्मद सुभान भट यांचा मोहम्मद अश्रफ भट हा मुलगा आहे. दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत राजकीय नेत्यांना लक्ष्य केलेला हा तिसरा हल्ला आहे.
लांगेत (जिल्हा कुपवाडा) भागात सुरक्षा दलांशी रविवारी झालेल्या चकमकीत अतिरेकी ठार झाला. अतिरेक्याला शोधण्याची मोहीम हाती घेताच चकमक उडाली. पाकिस्तानी सैनिकांनी कमलकोटे (उरी सेक्टर, जिल्हा बारामुल्ला) भागात नियंत्रण रेषेवर रविवारी सलग दुसºया दिवशी युद्धविरामाचे उल्लंघन केले. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
>सलग दुसºया दिवशी पाकचा गोळीबार
सलग दुसºया दिवशीही पाकिस्तानी सैन्याने कोणतेही कारण नसताना गोळीबार केला. भारतानेही त्याला चोख प्रतिउत्तर दिले. शनिवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात लष्कराचा हमाल ठार व दोन महिला जखमी झाल्या होत्या.