मोलकरणीसारखी दिसतेस सांगत महिलेला काढलं क्लबबाहेर
By admin | Published: June 27, 2017 01:23 PM2017-06-27T13:23:04+5:302017-06-27T13:23:04+5:30
पारंपारिक पोषाख घालून आल्याने मेघालयमधील एका महिलेला दिल्लीमधील गोल्फ क्लबने बाहेर काढल्याची लज्जास्पद घटना समोर आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा उत्तर पुर्वेकडील महिलेसोबत भेदभाव केल्याची घटना समोर आली आहे. आपला पारंपारिक पोषाख घालून आल्याने मेघालयमधील एका महिलेला दिल्लीमधील गोल्फ क्लबने बाहेर काढल्याची लज्जास्पद घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात निषेध होऊ लागला. यानंतर गोल्फ क्लबने माफी मागितली आहे.
टेलिन लिंगदोह असं या महिलेचं नाव असून आसाम सरकारमध्ये आरोग्य सल्लागार असणा-या डॉक्टर निवेदिता यांच्या मुलाचा त्या सांभाळ करतात. ज्या आठ पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्यामध्ये टेलिन लिंगदोह यांचाही समावेश होता. क्लबचे फार काळापासून सदस्य असणा-या पी तिमैया यांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं. लिंगदोह यावेळी पारंपारिक कपडे परिधान करुन क्लबमध्ये पोहोचल्या होत्या.
डॉक्टर निवेदिता यांनी सांगितलं की, ""आम्हाला पोहोतून फक्त 10 ते 15 मिनिटं झाली होती, तितक्यात मॅनेजर अजीत पाल आणि सुमिता ठाकूर नावाची एक महिला टेबलजवळ आली आणि लिंगदोहला बाहेर जाण्यास सांगू लागली. मी कारण विचारलं असता, ती एका मोलकरणीप्रमाणे दिसत असल्याचं सांगितलं. या निष्कर्षावर तुम्ही कसे आलात विचारलं असता, त्यांनी ती वेगळी दिसत आहे, मोलकरणीप्रमाणे कपडे घातले असून नेपाळी दिसत आहे असं उत्तर त्यांनी दिलं. हे खूपच अपमानास्पद होतं. अशा प्रकारच्या भेदभावाचा स्विकार करण्यासाठी मी तयार नव्हती"".
""भारतीय नागरिक असल्याने आपला पारंपारिक पोशाख घालण्याचं स्वातंत्र्य असून ते लोक त्याचा अपमान करत असल्याने मी विरोध केला. तिला आमंत्रित करण्यात आलं असून ती काय करते याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही असंही मी सांगितलं. मात्र तिथे उपस्थित असणा-या एकाही व्यक्तीने हस्तक्षेप केला नाही"", अशी माहिती डॉक्टर निवेदिता यांनी दिली आहे.
टेलिन लिंगदोह यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं आहे की, ""पारंपारिक कपडे परिधान करुन याआधी मी लंडन आणि युएईला गेली आहे, मात्र तिथे मला अशा परिस्थितींचा सामना करावा लागला नाही. तिथे उलट लोकांनी माझं कौतुक केलं. मात्र आपल्याच देशातील लोक आपली परंपरा, संस्कृतीपासून अनभिज्ञ आहेत".
याप्रकरणी रोष व्यक्त होऊ लागल्यानंतर दिल्ली गोल्फकडून माफी मागण्यात आली आहे. हे प्रकरण अजून चांगल्या पद्धतीने हाताळता येऊ शकलं असतं असं क्लबने म्हटलं आहे. एखाद्या पाहुण्याला अशा रितीने बाहेर जाण्यास सांगायला नको होतं. याप्रकरणी संबंधित कर्मचा-यांकडून उत्तर मागितलं असून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.