गरिबीला कंटाळून महिलेने 5 हजारात केला पोटच्या मुलीचा सौदा
By admin | Published: July 10, 2017 08:06 AM2017-07-10T08:06:04+5:302017-07-10T08:06:04+5:30
एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 10 - एखादी आई आपल्या पोटच्या मुलाला विकू शकते का ? असा प्रश्न विचारलं तर अनेकांचं उत्तर नाही असंच असेल. मात्र तेलंगणामधील खम्माम जिल्ह्यात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने आपल्या नवजात मुलीला फक्त पाच हजार रुपयांमध्ये विकून टाकलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानेच महिलेने आपल्या मुलीला विकण्याचा निर्णय घेतला होता.
आणखी वाचा
महिलेने शुक्रवारी सरकारी रुग्णालयात एका गोड मुलीला जन्म दिला होता. हे तिचं सहावं अपत्य होतं. खम्मामधील सहायक पोलीस आयुक्त पी व्ही गणेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलीला जन्म देणा-या महिलेने भद्राचलम येथील एका महिलेला आपली मुलगी विकून टाकली. यासाठी तिला रुग्णालयामधील एका कर्मचा-याने मदत केली होती"".
"मुलीच्या आईची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिचं पालन पोषण करण्यास ती असमर्थ आहे. यामुळेच रुग्णालयातील एका सफाई कर्मचा-याच्या मदतीने तिने आपल्या मुलीला फक्त पाच हजार रुपयांमध्ये विकून टाकत सौदा केला", असं सहायक पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. मुलीला खरेदी करणा-या वृद्ध महिलेने आपल्या घरात कोणी नात किंवा नातू नसल्यानेच आपण या मुलीला विकत घेतलं असल्याचं सांगितलं आहे. मात्र नंतर लगेचच या महिलेने रुग्णालयात जाऊन बाळाला आईच्या स्वाधीन केलं.
सहायक पोलीस आयुक्त पी व्ही गणेश यांनी सांगितल्यामुससार, सध्या एकात्मिक बाल विकास सेवेचे अधिकारी या मुलीचा सांभाळ करत आहेत. महिलेला आधीच पाच अपत्य असून चार मुली आणि एक मुलगा आहे. पतीला दारुचं व्यसन असून तो रिक्षा चालवतो. पती कमावलेला सर्व पैसा दारुवर उडवत असल्याने घरात एक पैसाही शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत आपल्या सहाव्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही असं महिलेने सांगितलं आहे.
मुलीला विकत घेणा-या महिलेने नंतर मात्र आपण आपल्या मुलाच्या उपचारासाठी पाच हजार रुपये दिले होते असा दावा केला आहे. पोलिसांनी मुलीला विकणा-या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय मुलीला विकण्यासाठी मदत करणा-या रुग्णालयामधील कर्मचारी आणि विकत घेणा-या महिलेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.